धैर्यशील कदमांकडे जबाबदारी,
संदीप कुलकर्णी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: आमदार जयकुमार गोरे यांच्याजागी कराड उत्तर मतदारसंघातील भाजपमध्ये प्रवेश केलेले धैर्यशील कदम यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काल देण्यात आली. भाजपने जिल्हाध्यक्षपदाची भाकरी फिरवल्याने येत्या विधानसभेला कराड-उत्तरमधील समीकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली. त्यानुसार 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात अनेक प्रस्थापितांना धक्का दिल्याचे दिसून येते. येत्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभाजन करून एका जिल्ह्यात दोन-तीन अध्यक्ष भाजपाने दिले आहेत.
कराड उत्तरमध्ये ताकद वाढली
गेल्या काही महिन्यांपूर्वीच धैर्यशील कदम यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता झालेल्या त्यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीत जयकुमार गोरे यांचीच छाप असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसप्रेमी जिल्हा होता. गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीचे 9 वरून केवळ 3 आमदार झाले. मात्र, कराड उत्तर हा राष्ट्रवादीकडेच राहिला. धैर्यशील कदम यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली व भाजपच्या मनोज घोरपडे यांनी बंडखोरी केल्याने या विभागणीत बाळासाहेब पाटील विजयी झाले. आता घोरपडेही भाजपचेच असून कदमही भाजपमध्ये आल्या भाजपची ताकद या मतदारसंघात वाढली आहे.
दरम्यान, यापूर्वी गजाभाऊ कुलकर्णी यांच्यानंतर डॉ. दिलीप येळगावकर, विक्रम पावसकर, जयकुमार गोरे अशा धडाडीच्या नेत्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्षपद भूषवले आहे. गोरे-पावसकर-येळगावकर यांच्या तुलनेत कदम हे मृदुस्वभावी मानले जातात. त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कारकीर्दीकडे सर्वांचे लक्ष आहे
स्वतंत्र अस्तित्व दाखवणार का?
मूळचे गोरेगाव वांगी येथील असलेले धैर्यशील कदम यांची खटावच्या पंचायत समिती सदस्यपदापासून कारकीर्द बहरली. सुरुवातीला खटावचे माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांचे ते समर्थक होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही ते काहीकाळ रमले. पुसेसावळी गटात त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले. सौभाग्यवतींना खटाव पंचायत समिती सभापतीपदी बसवून आपली मुत्सद्देगिरी स्पष्ट केली. त्यानंतर जिल्हा परिषद गटातूनही सुनिता कदम यांना निवडून आणले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पुसेसावळी जिल्हा परिषद गट कराड-उत्तरमध्ये विलीन झाला. तेव्हापासून त्यांनी कराड उत्तर मतदारसंघात लक्ष घातले. दोनदा विधानसभेची निवडणूक लढवून अपयश आले तरी स्वत:ला या मतदारसंघातील महत्त्वाचा नेता असल्याचे त्यांनी सिद्ध केले. वर्धन अॅग्रोच्या माध्यमातून त्यांनी दोन्ही तालुक्यात मोठा मतदारसंघ बांधला असून आता भाजप जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात ते स्वतंत्र अस्तित्व दाखवून या संधीचे ते सोने ते कसे करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
मनोज घोरपडेेंचा मार्ग मोकळा?
धैर्यशील कदम यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर अनेकदा तत्कालीन जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांना कराड-उत्तरचा उमेदवार कोण? अशी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी आम्ही तिघेही आमदार होणार असल्याचे म्हटले होते. उमेदवारीतील ट्विस्ट जिल्हाध्यक्षपदी कदमांची वर्णी लागल्याने सुटल्याची चर्चा असून कराड-उत्तरच्या उमेदवारीवरील मनोज घोरपडे यांचा दावा बळकट झाल्याचे मानले जात आहे.

0 Comments