सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मेढा: - सातारा जिल्ह्यात दोन दिवसा पूर्वी वाई तालुक्यातील ओझर्डे पाठोपाठ चोरट्यानी घरफोडी साठी जावली तालुक्याला निशाना केला आहे. शनिवारी रात्री भिवडी येथील सात बंद घरे चोरट्यानी फोडून सोने व रोख रकमेवर डल्ला मारला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यानी बंद घरांचे कडी कोयंडे तोडून चोरी केली. यामध्ये किसन चव्हाण यांच्या घरातून तीन तोळ्याचे गंठण, सागर भिसे यांच्या घरातून अर्धा तोळ्याची अंगठी व रोख अठराशे रुपये चोरट्याने लंपास केले. याशिवाय बबन चव्हाण, कृष्ण राव चव्हाण, रविकांत दरेकर, भरत चव्हाण, संपतराव तरडे यांचीही घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. चोरट्याने घरातील सामान कपडे यांची तोडफोड व नासधुस केली.
चोरी करीत असताना घरातील कपाट चोरटे उचकटताना शेजारील घरातील इसम जागा झाल्याने त्याला चोरीचा संशय आला. त्यामुळे त्याने गावातील सरपंच व पोलीस पाटील यांना याबाबत सांगितले नंतर ग्रामस्थ घरा बाहेर आले असता काही घरांचे कडी कोयंडे तोडल्याचे दिसले. त्यानंतर सर्वाना सावध करण्यासाठी सरपंचांनी ग्रामपंचायत वरील भोंगा वाजवून धोक्याची सूचना दिली. याबाबत ची माहिती पोलीस पोलीस पाटल पवार यांनी पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर कुडाळ पोलीस दुरुक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे व सहकार्याने घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी परिसरातील गावातील ग्रामस्थांनाही सावध केले. चोरीच्या घटना टाळण्यासाठी ग्राम सुरक्षा तसेच पोलिसांनीही रात्रीची गस्त वाढवणे आवश्यक आहे.
कुडाळ मध्ये तीन वर्षांपूर्वी गावातील लोकांनी वर्गणी काढून सीसीटीव्ही यंत्रणा बसवली. त्यामुळे गावातील अनेक घटनांवर पोलिसांचे नियंत्रण राहत होते. परंतु काही दिवसात ही यंत्रणा बंद पडली. सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप पर्यंत सीसीटीव्ही सुरू करण्यात आले नाहीत. सदरची सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने व पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
0 Comments