चोरट्यांचा साडेतीन लाखांवर डल्ला
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज : दोनच दिवसांपूर्वी पोलीस असल्याचे सांगून वृद्धाला लुटल्याची घटना ताजी असतानाच वडूज-सातारा रस्त्यावरील रहिवाशी महिला नेत्याचा बंगला फोडून चोरट्यांनी तब्बल साडेतीन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. यामुळे वडूज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरटे जोमात तर वडूज पोलीस कोमात गेले असल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
याप्रकरणी शशिकला मुकुटराव जाधव (देशमुख) (वय 56, रा. वडूज) यांनी फिर्याद दिली. येथील सातारा रस्त्यावर कोर्टाशेजारी मार्केट कमिटीसमोर त्यांचा बंगला असून देशमुख या चार दिवसांसाठी बाहेरगावी असताना हा प्रकार घडला. रविवार दि. 15 गुरुवार दि. 19 दरम्यान पाचच्या सुमारास ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी जाधव यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा व लोखंडी ग्रील उचकटून घरात प्रवेश केला. व घरातील 20 हजार रुपये किंमतीचा राणीहार 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दोन तोळ्यांचे कॉईन, 60 हजार रुपये रोख, असा 3 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
घटनास्थळी दहिवडी उपविभागाच्या उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. तपास पोलीस उपनिरीक्षक भिलारी तपास करत आहेत.
चोरटे जोमात, वडूज पोलीस कोमात
वडूज परिसरात मोबाईल चोर, पोलीस असल्याचे सांगून फसवणारे भामटे तसेच घरफोडी करणार्या भामट्यांचा सुळसुळाट झाला असून चोरटे जोमात व वडूज पोलीस कोमात असल्याचे दिसत आहे. सणासुदीच्या तोंडावर एका पाठोपाठ एक चोरीच्या, फसवणुकीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वडूजच्या कारभार्यांनी अॅक्शन मोडमध्ये येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
0 Comments