संकेत इंगळे
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्कग्रामपंचायतींचे सोमवारी लागलेले निकाल हे महायुतीचा आत्मविश्वास द्विगुणित करणारे ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वपरिक्षेमध्ये भाजप, शिवसेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी भरगोस यश मिळवुन 50 टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर महायुतीचा झेंडा फडकवला आहे.
अजित पवारांच्या महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर भाजपा आता संपेल, अजित दादांना सोबत घेऊन भाजपा ने चूक केली असे म्हणणारे काल तोंडात बोट घालून अवाक झालेले पाहायला मिळाले. शरद पवारांना 80 वर्षांचा योद्धा म्हणून संबोधणाऱ्यांना अजित दादांनी अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला की साहेबांचे आता वय झाले आहे त्यांना आराम करू द्या मात्र काही अती उत्साही नेते आणि कार्यकर्त्यांनी पवार साहेबाना राजीनामा मागे घ्यायला भाग पाडले आणि आज त्याचा परिणाम आकड्यांमधून अजित पवारांनी दाखवून दिला. उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही तेच घडले आहे. ज्या शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेना चालते त्यांना नेहमी मातोश्रीच्या बाहेरच जागा मिळाली. आणि मग एकनाथ शिंदेंसारख्या बाळासाहेबांच्या, आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेच्या कामातून आणि कर्तृत्वाने मोठे झालेल्या नेत्याला कायम घरात बसून राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी तुम्ही काय केले हा प्रश्न विचारणे म्हणजे हास्यास्पद आहे.
अलीकडच्या काळात भाषणातून नेहमी माझे वडील चोरले, पक्ष चोरला असे म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी कधीतरी जनतेत जाऊन त्यांचाही विचार घ्यायला हवा होता. ते केले असते तर आज 200 पेक्षाही कमी ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले नसते. काँग्रेस हा तर राष्ट्रीय पक्ष आहे, तरी पण त्यांच्याकडे आजही नेतृत्वाची कमतरता भासते. फक्त विदर्भ म्हणजेच महाराष्ट्र हे नाना पटोलेंना अजूनही समजलेले नाहीये आणि त्याचा परिणाम त्यांनीही कालच्या निकालात पहिला. एकंदरीतच काय तर या सगळ्यांना असलेला अति आत्मविश्वास नडला आणि भाजपाने त्याच संधीचे सोने करत तळागाळापर्यंत भाजपाची मुळे रुजवली.
निकाल टीव्ही वर पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे भाजपचे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष संपवून संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाचा विस्तार करण्याचे धोरण हळूहळू यशस्वी होत आहे. कारण प्रत्येक चॅनेलवर निकाल दाखवताना भाजपा, काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष दिसत होते आणि बाकी शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट असे सगळे गटच दिसत होते. ज्या लोकांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ते इतके वर्षं राज्य कसे सांभाळत होते हेच जनतेला विशेष वाटत असणार. त्यामुळेच काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी आता तरी टीका टिप्पणी यात वेळ न घालवता जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिले पाहिजे तरच भविष्यात अशी वेळ येणार नाही. या निकालावर आत्मपरीक्षण करणे महाविकास आघाडीला आता भाग पाडले आहे.
0 Comments