सत्य सह्याद्री
औंध: औंधमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दुरंगी लढत होत आहे. स्थानिक राजकारण हे स्थानिक आघाड्यांवर अवलंबून असते मात्र औंधचा अनेक वर्षांचा इतिहास पहिला तर नव्वदीच्या दशकात काँग्रेस प्रणित आघाडीचे पॅनल विरुद्ध भाजपा, शिवसेना प्रणित पॅनल अशी लढत होत होती. नंतर नव्वदीचे दशक संपत संपत राष्ट्रवादीचा उदय झाला तेव्हापासून राष्ट्रवादी प्रणित पॅनल विरुद्ध भाजपा, काँग्रेस, शिवसेना यांचे एकत्रित पॅनल अशी लढत सुरू झाली. एकंदरीतच काय तर आत्तापर्यंत औंधच्या राजकारणाला कायम पक्षीय पातळीचा रंग होता, आणि आता मात्र सुरू झालाय तो जातीयतेचा रंग.
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा अगदी केंद्रात सुद्धा खूप गाजला आहे. मराठा समाजाच्या वतीने उपोषण केलेले मनोज जरांगे हे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. खटाव तालुक्यात देखील जरांगेचा दौरा झाला. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे ही जरांगेची आग्रही मागणी असल्याने आता ओबीसी संघटनांकडून त्याला विरोध होऊ लागला आहे. प्रत्येक गावागावांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असे दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसू लागले आहेत. औंधच्या राजकारणाची परिस्थिती देखील अशीच काहीशी होऊ लागली आहे. औंधची ग्रामपंचायत अवघ्या दोन चार महिन्यांवर आली असताना औंधमध्ये ओबीसी संघटनेकडून स्वतंत्र पॅनल उभे करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. अलीकडेच ओबीसी संघटनेने एक बैठक घेऊन औंधच्या राजकारणात स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. ज्या सांस्कृतिक वारसा असलेल्या औंधमध्ये राजकारण सुद्धा तत्वाने आणि सर्वसमावेशक होत होते त्या औंधला आज जातीयतेच्या तराजुमध्ये तोलले जात आहे याला जबाबदार नक्की कोण आहे. ही जातीयतेची आणि असुरक्षिततेची भावना जनतेच्या मनात कुठून आली. याला सरकार जबाबदार आहे की जातीयतेमध्ये अडकलेले आपणच आहोत हे जनतेला पडलेले कोडे आहे.
औंध ग्रामपंचायतीमध्ये सध्या जातीवरून जे राजकीय गट पडू लागले आहेत त्या सर्वांना सामान्य जनतेकडून एकच विनंती असेल की औंधमध्ये पूर्वीप्रमाणे मैत्रीपूर्ण राजकारण असावे आणि औंधच्या राजकारणाला जो सांस्कृतिक वारसा आहे तो तसाच अबाधित राहावा, कारण जातीयतेचा रंग हा औंधच्या राजकारणाला न परवडणारा आहे.
No comments:
Post a Comment