सातारा : प्रतिनिधी इथे बसून जनतेसमोर माण - खटावचा स्वाभिमान आणि अस्मितेबाबत बाता मारणाऱ्यांनी जाच स्वाभिमान बारामती आणि फलटणला गहाण टाकला आहे. इथली उमेदवारी ठरवायला हे सगळे लाचार त्यांचे तळवे चाटत आहेत. माण - खटावच्या पाणीयोजना पूर्ण करण्यात अडथळे आणणाऱ्यांसाठी माझे विरोधक टाळ्या वाजवतात ही खरी शोकांतिका असल्याचे प्रतिपादन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
बोराटवाडी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी मा. आ. डॉ. येळगावकरांसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. गोरे पुढे म्हणाले, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणि भक्कम पाठबळावर आजपर्यंतची १७ वर्षांची यशस्वी कारकीर्द घडली आहे. माण - खटावच्या स्वाभिमानी मातीने आणि इथल्या माता - भगिनींनी मला नेहमीच आशिर्वाद दिले आहेत. प्रत्येक निवडणूकीत विरोधकांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करुन मला अडवायचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात जीवाच्या आकांताने रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करुन मी हजारो रुग्णांचे प्राण वाचवताना कधी पक्ष, पार्टी बघितली नाही. मोफत उपचार करण्यासाठी बॅंकेचे कर्ज घेतले. रुग्णांची जीव वाचवायला ऑक्सिजन मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले तरीही बारामतीच्या सांगण्यावरुन माझ्यावर पैसे खाल्ल्याचा खोटा आरोप करण्यात आला. जेव्हा जेव्हा विरोधकांनी अशी षडयंत्रे रचून मला अडवायचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा मी उसळी घेऊन नव्या जोमाने उभा राहिलो आहे. माझ्या पाठिशी जनतेचे आशिर्वाद नेहमीच राहिले आहेत.
आ. गोरे पुढे म्हणाले, मी नेहमी उद्दिष्ट ठेवून टाईम बाऊंड काम करत आलो आहे. पाण्याच्या बाबतीत जो जो शब्द मी जनतेला दिला तो तो शब्द पूर्ण करताना परमेश्वर माझ्या पाठिशी उभा राहिला आहे. उरमोडी, जिहेकठापूर,तारळीचे पाणी आणले आहे. टेंभूचे पाणी देणाऱ्या योजनेचे काम वेगाने सुरु केले आहे. माणच्या उत्तर भागाला पाणी दिले आहे. उर्वरित २१ गावांसाठी योजना मंजूर करुन आणली आहे. औंधची पाणीयोजना मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आणली आहे. दुष्काळमुक्तीची लढाई मी अंतिम टप्प्यात आणली असताना इथले विरोधी लाचार पाण्याला विरोध करणाऱ्यांसाठी टाळ्या वाजवतात ही शोकांतिका आहे. आज माझा कार्यकर्ता चॉकलेट मागितल्यासारखा लाईटचा डीपी मागतो. मागेल ते काम करुन दिल्यानेच माझ्या कार्यकर्त्यांनी गावोगावी विकासकामांचे फलक लावले आहेत. प्रत्येक गावात झालेली कोट्यवधींची कामे पाहून विरोधी इच्छुकांचे फिरणेही मुश्किल झाले आहे. आम्ही प्रचंड काम केलय. पाणीयोजना मार्गी लावल्या आहेत. आमच्याकडे सांगण्यासारखे भरपूर आहे. विरोधकांकडे मात्र सांगायला एकही काम नाही. माझ्यासमोर आता औद्योगिक वसाहत सुरु करायचे आणि शैक्षणिक क्रांती करायचे उद्दिष्ट आहे. भरकटलेल्या विरोधकांकडे मला अडविणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्याने जनता त्यांना थारा देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चौकट .....
बारामती, फलटणकरांपुढे झुकणार नाही ....
माझी सुरुवातीपासूनची लढाई प्रस्थापितांविरोधात आहे. माझे राजकारण संपले तरी चालेल पण मी बारामती ,फलटणकरांपुढे झुकणार नाही. मी त्यांच्यापुढे झुकलो असतो तर माण - खटावच्या पाणीयोजना मार्गी लागल्या नसत्या. माझ्या कार्यकर्त्याला कधी मान खाली घालायला लागली नाही आणि यापुढेही लागणार नाही असा विश्वासही आ. गोरेंनी व्यक्त केला.
फोटो : बोराटवाडी येथे नियोजन बैठकीत बोलताना आ. जयकुमार गोरे.
No comments:
Post a Comment