बॉलीवूडमधील ग्लॅमरस आणि बिंदास व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाणारी नेहा धुपिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या खासगी आयुष्यातील ‘बोल्ड’ अनुभव शेअर केला.
२०१८ साली अभिनेता अंगद बेदीसोबत नेहाने लग्न केले. मात्र लग्नाआधीच तिची प्रेग्नन्सी समोर आली आणि मग काय – सोशल मीडियावरून ते फिल्मी वर्तुळात सगळीकडे तिच्याबद्दल कुजबुज सुरू झाली. “लग्नाआधीच बाळ वाढवण्याचा निर्णय लोकांना अजिबात पचला नाही. मला कितीतरी कमेंट्स, नजरा आणि टीकेला सामोरे जावं लागलं,” असं नेहाने स्पष्ट सांगितलं.
पण या सगळ्यावर ती खचली नाही. उलटपक्षी अंगद बेदी आणि कुटुंबाचा मिळालेला पाठिंबा तिला आणखी मजबूत करून गेला. “स्त्रीच्या आयुष्याचे निर्णय तिचे स्वतःचे असतात – मग तो लग्नाचा असो, गर्भधारणेचा असो किंवा मातृत्वाचा. समाजाच्या मान्यतेची गरज नाही,” असा ठाम संदेश नेहाने दिला.
आज नेहा दोन मुलांची आई आहे आणि सध्या फिल्म्ससोबत डिजिटल प्रोजेक्ट्समध्येही सक्रिय आहे. तिच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या धैर्याचं कौतुक केलं.
नेहाचा हा अनुभव पुन्हा एकदा दाखवून देतो की, बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेतसुद्धा स्त्रियांना त्यांच्या वैयक्तिक निर्णयांवरून न्यायलं जातं. मात्र बिंदास नेहाने आपल्या स्टाईलमध्ये समाजाला झटका दिला – “माझं आयुष्य, माझे नियम!”
0 Comments