Ticker

6/recent/ticker-posts

सराईत आरोपी जेरबंद, दहा गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ८.८६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा : घरफोडी, जबरी चोरी अन शेतीपंप चोरीच्या सातारा जिल्ह्यातील एकूण १० गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत आरोपींना अटक केली. आरोपींकडून ८ लाख ८६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गणेश दिलीप जाधव (वय ३०, रा. उंब्रज, ता. कराड) अन अमोल लालसो शेळके (वय ३६, रा. गावठाण ढेबेवाडी, ता. पाटण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

सातारा जिल्ह्यात शेतीपंप चोरी, घरफोडी अन जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी अन अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण देवकर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले.

दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील रेठरे बुद्रुक येथे चोरी करणारे आरोपी एका बारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

 त्यानुसार पथकाने कोळेवाडी येथील बारजवळ सापळा रचला. त्या ठिकाणी दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस असल्याचा संशय येताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. पुढील तपासात आरोपींनी कराड शहर, कराड तालुका, मसूर, कोयनानगर अन पाटण हद्दीतही गुन्हे केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन, हत्यार तसेच सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, दुचाकी अन शेतीपंप असा एकूण ८.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अन कराड तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.



Post a Comment

0 Comments