Ticker

6/recent/ticker-posts

१३ वर्षीय मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण; पळशी येथील संतापजनक घटना

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

गोंदवले:
माण तालुक्यातील पळशी येथे एका १३ वर्षीय बालकाला ५० रुपये चोरल्याच्या खोट्या संशयावरून लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या हाताला आणि नाकाला फॅक्चर झाले आहे. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात रोहित सुभाष लोखंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन श्रीरंग करडे (वय ३८, रा. पळशी) हे कामासाठी कराड येथे गेले होते. ८ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास त्यांचा मुलगा सुयश हा मित्रांसोबत रंगपंचमी खेळत असताना, आरोपी रोहित लोखंडे याने त्याला बोलावून घेतले. "दुकानाच्या गल्ल्यातून ५० रुपये घेऊन ये" असे रोहितने सुयशला सांगितले.
​सुयश गल्ल्यातून पैसे काढत असताना, रोहितने आपल्या मोबाईलमध्ये त्याचे शूटिंग केले. त्यानंतर "तू आमच्या दुकानातून पैसे चोरत आहेस" असा खोटा आरोप करून, त्याला दुकानातून ओढत बाहेर काढले. तिथे त्याला लाकडी काठीने दोन्ही पायांच्या नडगीवर, पाठीवर आणि हातावर बेदम मारहाण केली.
​मुलाची प्रकृती चिंताजनक
​मारहाणीमुळे सुयश हा बेशुद्ध पडला होता. घटनेची माहिती मिळताच वडिलांनी त्याला तातडीने म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सुयशच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि नाकावर फॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
​मुलगा शुद्धीवर आल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर सचिन करडे यांनी ११ मार्च २०२६ रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी रोहित सुभाष लोखंडे (रा. पळशी, ता. माण) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करत आहेत.
​एका लहान मुलाला किरकोळ कारणावरून अशा प्रकारे अमानुष मारहाण केल्यामुळे पळशी परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments