सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सातारा नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री ढोल्या गणपती (श्री गणपती देव, माची पेठ) मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवार दि. १९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, वृषालीराजे भोसले तसेच सत्वशीलाराजे अक्षोभसिंह सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त विधीज्ञ राजीव सबनीस यांनी दिली.
साताऱ्यातील अनेक कुटुंबांमध्ये मुंज, लग्न, वास्तुशांत अशा मंगल कार्यांपूर्वी प्रथम अक्षदा या गणपतीला अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या गणपतीला सातारावासीयांचे विशेष श्रद्धास्थान मानले जाते.
ही गणेशमूर्ती स्वयंभू स्वरूपातील उजव्या सोंडेची असून नैऋत्य दिशेकडे पाहणारी आहे.
मूर्तीच्या कंबरेभोवती नागाचा विळखा असल्याने या गणपतीला ‘नागचाप विनायक’ असेही संबोधले जाते. अदालत वाड्याजवळ अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी प्रचंड शिळेत कोरलेली ही मूर्ती आहे. शेंदूराचे थर असल्याने या गणपतीला ‘ढोल्या गणपती’ म्हणून ओळख मिळाली.
या गणपतीचे मूर्तीचा इतिहास १२ व्या शतकात म्हणजे भोज राजाने ज्यावेळी मंगळाई (अजिंक्यतारा) किल्ला बांधला त्या काळातील आहे. श्री शिव छत्रपती काळात त्यास मंगळाई डोंगर / किल्ला अशा नोंदी आहेत.
धर्मवीर छ. संभाजीराजे यांचे बलिदाना नंतर औरंगजेबाचा मुलगा अजीम याने किल्ल्यास ६ महिने वेढा घातला होत. त्यास किल्ला जिंकता आला नाही परंतु नंतर त्यांचे ताब्यात किल्ला गेल्यावर त्याने किल्ल्यास 'अजीमतारा' हे नाव ठेवले होते. पुढे मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला ताब्यात घेतला व त्यास सध्याचे 'अजिंक्यतारा' हे नाव ठेवले. या अजिंक्यतारा पायथ्याशी अदालत वाड्याच्याजवळ हा प्रंचड शिळेत कोरलेला गणपती आहे. आकाराने मोठा व पूर्वी शेंदूराचे थर असलेने तो ढोल्या गणपती म्हणून प्रचलीत झाला.
मंदिर सध्या दगड, वीट अन पत्र्याच्या छपराच्या बांधकामात असून त्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे.
मंदिराचा आराखडा अन अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून पूर्ण झाल्यानंतर मंदिर आकर्षक स्वरूपात उभारले जाणार आहे.
या जीर्णोद्धारासाठी गणेशभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. देणगीसाठी गोडबोले सुगंधी, तांदुळ आळी, सातारा येथे संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.

0 Comments