Ticker

6/recent/ticker-posts

बुकिंग न करताही ‘सिलेंडर घेतल्याची’ नोंद; निमसोडला भारत गॅस एजन्सीच्या कारभारावर संशय


निमसोड, ता. खटाव : ग्राहकांनी बुकिंग न करताही त्यांच्या नावावर गॅस सिलेंडर ‘घेतल्याची’ नोंद दाखवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने निमसोड येथील भारत गॅस एजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ग्राहकांनी सिलेंडर बुकिंग केले नसतानाही त्यांच्या खात्यावर सिलेंडर वितरित झाल्याची नोंद दिसत आहे. याबाबत चौकशी केली असता एजन्सीकडून “कार्ड बंद पडू नये म्हणून कंपनीच बुकिंग करते” असा खुलासा करण्यात येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

ग्राहकांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. बुकिंग न करता सिलेंडर कसा दाखवला जातो? ग्राहकाच्या परवानगीशिवाय नोंद कोण करतो? आणि या नोंदीमागे कोणाचा फायदा होतो? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

काही ग्राहकांनी अनेक महिन्यांपासून सिलेंडर घेतला नसतानाही त्यांच्या खात्यावर वितरण दाखवण्यात आल्याचा दावा केला आहे. चौकशीसाठी गेलेल्या ग्राहकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संताप वाढला आहे.

या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, ग्राहकांच्या बुकिंग इतिहासाची तपासणी करावी आणि खोटी नोंद करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments