Ticker

6/recent/ticker-posts

कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न



कराड : सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सातारा अन सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील शेणोली स्टेशननजीक सिग्नलशी छेडछाड करून रेल्वे थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड घडवून आणत सिग्नल बंद पाडला. त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेसला अचानक थांबावे लागले. रेल्वे थांबताच चोरट्यांनी काही डब्यांमध्ये घुसून प्रवाशांना लक्ष्य केले.

चोरट्यांनी किमान तीन डब्यांमध्ये प्रवेश करत प्रवाशांकडील सोने-चांदीचे दागिने, मोबाईल तसेच इतर मौल्यवान वस्तू हिसकावल्याची माहिती पुढे येत आहे. काही प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली असून अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वेमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित प्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून रेल्वे थांबवणे हा गंभीर प्रकार असल्याने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments