सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सातारा मुख्य टपाल कचेरीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कारवाईला वेग देण्यात येत असून प्रलंबित दावे निकाली काढले जातील, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी दिले. प्रकरण केंद्रीय तपास संस्थेकडे असून गुन्हा नोंदवून तपास सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.
एप्रिल २०२४ मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात ८० ते ९० खातेदारांचे दावे तयार करण्यात आले होते. काही खात्यांतील सह्या न जुळल्याने ऑगस्ट २०२४ मध्ये संबंधित दावे फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आले. मात्र त्यानंतरही सुमारे १५ ते २० खातेदारांचे दावे प्रलंबित आहेत.
प्रलंबित दाव्यांमुळे संबंधित ठेवीदार टपाल कचेरीत वारंवार पाठपुरावा करत असून तातडीने रक्कम मिळावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणामुळे टपाल सेवांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या विषयाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक माध्यमावरून प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रतिसाद देताना सिंदिया यांनी विभागीय चौकशी सुरु असल्याचे सांगत दावे योग्य पडताळणीनंतर निकाली काढले जातील, असे स्पष्ट केले.
टपाल सेवांची विश्वासार्हता जपणे हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगण्यात आले असून उर्वरित दावे तातडीने निकाली काढावेत, अशी ठेवीदारांची मागणी कायम आहे. या प्रकरणात अनेक नागरिकांचे लाखो रुपये अडकले होते. सुरुवातीला प्रशासनाने कारवाईचे आश्वासन देत तपास सुरु केला होता. काही पातळीवर चौकशी पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी सर्व ठेवीदारांना पैसे परत मिळाल्याचे चित्र स्पष्ट नाही. काहींना अंशतः रक्कम मिळाल्याची माहिती आहे, तर अनेक जण अजूनही प्रतीक्षेत आहेत. संबंधित एजंटविरोधात कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याने अंतिम निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे संपूर्ण रक्कम परत मिळण्यास विलंब होत आहे.





0 Comments