Ticker

6/recent/ticker-posts

५० लाखांसह दागिने लुटणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद, वडूज पोलिसांची दमदार कामगिरी

 

मायणी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क: खारघर येथे घराजवळ चाकूचा धाक दाखवून व पिस्तूल रोखून तब्बल ५० लाख रुपये रोख व ४० लाख ६० हजार रुपयांचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा तीन दिवसांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणातील दोन संशयितांना जेरबंद करण्यात आले असून मुख्य सूत्रधार फरार आहे.

पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खारघर येथे राहणारे सुशांत नामदेव मोरे हे कार पार्किंग करत असताना तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. हातावर चाकूचे वार करून व पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने तसेच ५० लाख रुपये रोख हिसकावून आरोपी फरार झाले.

या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तत्काळ तपास सुरु करत परिसरातील CCTV फुटेज तपासले. आरोपींचे वर्णन व नंबर प्लेट नसलेल्या कारचा मागोवा घेत टोलनाक्यांचे फुटेज तपासण्यात आले. या तपासातून आरोपींची कार साताऱ्याकडे गेल्याचे स्पष्ट झाले.

तपासात आरोपी महाबळेश्वरमार्गे मायणी परिसरात आल्याचे उघड झाले. मुख्य सूत्रधार हर्षद सागरे (रा. सांगली) याने अंबवडे येथील शुभम धनाजी पाटोळे (वय २०) व दातेवाडी येथील संदीप कृष्णदेव गुजले (वय २०) यांना हाताशी धरून हा गुन्हा केला होता. मायणी येथे दोघांना सोडून प्रत्येकी ७० हजार रुपये देण्यात आले व उर्वरित रक्कम नंतर वाटून घेण्याचे सांगून मुख्य आरोपी सांगलीकडे निघून गेला.

दरम्यान, सातारा पोलिसांच्या मदतीने तपासाची सूत्रे वेगाने हलली. खारघर येथील एपीआय निलेश येवले व दळवी यांनी संपर्क साधल्यानंतर वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तातडीने कारवाई सुरु केली. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मदतीने संशयितांच्या हालचालींची माहिती मिळाली.

गुरसाळे येथे संशयित असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची गाडी पाहताच संशयितांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून शुभम पाटोळे व संदीप गुजले यांना पकडण्यात आले.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हर्षद सागरे फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथक सांगलीकडे रवाना झाले आहे. पुढील तपास सुरु आहे

Post a Comment

0 Comments