Ticker

6/recent/ticker-posts

कोयना बॅकवॉटरमध्ये युवकाला जलसमाधी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर: वानवली तर्फे सोळशी येथील कोयना बॅकवॉटर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संकेत विठ्ठल जाधव (वय २४, रा. सोनवाडी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर) हे त्यांच्या मित्र श्याम साहेबराव चंद्रावत (वय ३४) यांच्यासोबत सकाळी मॉर्निंग वॉकसाठी हॉटेल परिसरातील रस्त्यावर गेले होते. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर दोघेही वानवली तर्फे सोळशी येथील कोयना बॅकवॉटर परिसरातील काठावर काही वेळ बसले होते.

यानंतर सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी श्याम चंद्रावत हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. त्यानंतर संकेत जाधव हे देखील पोहण्यासाठी पाण्यात गेले. पोहत असताना संकेत जाधव हे सुमारे ५० ते ६० फूट अंतरावर गेले होते. मात्र परत येत असताना ते अचानक हातपाय हलविणे थांबवून पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. 

घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिक व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर तात्काळ सीपीआर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी फिर्यादी श्याम चंद्रावत यांच्या माहितीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.वाबळे करीत आहेत. 

पर्यटनस्थळी पाण्यात उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments