Ticker

6/recent/ticker-posts

हुतात्मा कर्नल संतोष महाडिक स्मारकाला युवा अधिकाऱ्यांची मानवंदना

 


सातारा (सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क): OTA गया येथून नुकतेच नियुक्त झालेले २० युवा अधिकारी साताऱ्यातील हुतात्मा कर्नल संतोष यशवंत महाडिक यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली. देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या या वीर अधिकाऱ्याला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. या पथकात तीन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

BEG अँड सेंटर (बॉम्बे सॅपर्स) यांच्या संपर्क उपक्रमांतर्गत हा दौरा पार पडला. सातारा जिल्ह्याच्या सैनिक परंपरेला मान देत अधिकाऱ्यांनी प्रथम हुतात्मा कर्नल महाडिक यांच्या स्मारकाला भेट दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर ECHS व जिल्हा सैनिक कल्याण मंडळ येथे भेट देऊन युद्ध व शारीरिक हानीग्रस्त सैनिक तसेच वीर नार्‍यांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या अडचणी समजून घेत विविध कल्याणकारी योजना व सुविधा यांची माहिती देण्यात आली. तक्रारींचे निराकरण व वेळेत मदत मिळण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

दौऱ्याचा समारोप सैनिक स्कूल सातारा येथे भेट देऊन झाला. या संस्थेने देशाला अनेक अधिकारी दिले असून विद्यार्थ्यांशी संवादातून मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमातून हुतात्म्यांच्या सन्मानाबाबत व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाबाबत सेनेची बांधिलकी स्पष्ट झाली. “सेवेपुढे सर्व काही” या तत्त्वाची जाणीव युवा अधिकाऱ्यांना झाली.

या प्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सतेश हंगे, मेजर डी. मोरे, मेजर नवनीत सिंग, शंकर माळवदे, प्रशांत कदम, राजकुमार शिंदे, प्रवीण शिंदे, संतोष भोसले, गणपत भोसले, हणमंत भोसले, धोंडीराम भोसले, राजाराम भोसले, पोपट भोसले, महेश जाधव, अशोक फडतरे, हनुमंत देवकुळे, लक्ष्मण जगताप, अशोक रवंदळे, आदित्य साळुंखे, सचिन साळुंखे व इतर माजी सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments