Hot Posts

6/recent/ticker-posts

अपहरण, खंडणीप्रकरणी लल्लनसह पाच जणांवर गुन्हा


 सत्य सह्याद्री/ सातारा 

साताऱ्यात व्यवसाय करायचा असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या घरातील लोकांना संपवू, अशी धमकी देत मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गंभीर प्रकार सातारा शहरातील विकासनगर परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी लल्लन जाधवसह पाचजणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 इलेक्ट्रॉनिक व घरगुती उपकरणांची किरकोळ विक्री करणारे मोहसिन कासम मुल्ला (वय २७ ,रा. लक्ष्मी अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०, विकासनगर, खेड, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून अजय ऊर्फ लल्लन दत्तात्रय जाधव (रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. जि. सातारा), विजय ऊर्फ बंबारू दत्तात्रय जाधव (रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. जि. सातारा), ओमकार भरत देठे (रा. प्रतापसिंहनगर, सातारा), सर्जेराव ऊर्फ छोट्या पांडुरंग कांबळे (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) तसेच एका अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

आरोपी क्रमांक १ ते ३ आणि त्यांच्या अनोळखी साथीदाराने वेळोवेळी फिर्यादीला, साताऱ्यात धंदा करायचा असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील; अन्यथा तुला व तुझ्या घरातील लोकांना संपवू, अशी धमकी दिली. एक लाख रुपये न दिल्याने फिर्यादीला काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय बंबारू जाधव याने दमदाटी करून ९ जून २०२६ रोजी दत्ता जाधव यांच्या वाढदिवसासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली आणि त्यापैकी दोन हजार रुपये घेतल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर वाघेरी येथून फिर्यादीला बळजबरीने एक्सयूव्ही गाडीत बसवून सातारा येथे घेऊन येण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपी वारंवार घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.  

हा प्रकार १ जून २०२६ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वेळोवेळी विकासनगर, सातारा येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद असून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.२४ वाजता सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम ३०८(४), ३०८(५), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातारा शहर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments