मध्यरात्री सहा-सात चोरट्यांचा धुडगूस; कुटुंबीय जागे होताच नागरिकांना फोन, चाहूल लागताच चोरट्यांचे पलायन
वडूज : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. सुमारे सहा ते सात चोरट्यांनी घराचे दरवाजे कटावणीने उचकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजावर झालेल्या आवाजाने शिंदे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी परिसरातील नागरिकांना फोन करून माहिती दिल्यानंतर नागरिक जागे झाल्याची चाहूल चोरट्यांना लागली आणि त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले.
दहिवडी रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील सजगणे वस्तीवर विजय शिंदे यांचे घर आहे. बुधवारी (ता. ७) मध्यरात्री तीनच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या पूर्वेकडील दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उचकटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाजूची खिडकी तोडून दरवाजाची आतून लावलेली कडी उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, खिडकीलगतच लोखंडी कपाट असल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.
दरवाजावर काहीतरी आपटल्याचा आवाज आल्याने शिंदे कुटुंबीय जागे झाले. त्यानंतर चोरट्यांनी पश्चिमेकडील दरवाजाचीही तोडफोड सुरू केली. कटावणीच्या सहाय्याने दरवाजा उचकटून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून परिसरातील नागरिकांना चोरटे आल्याची माहिती दिली.
काही वेळातच परिसरातील नागरिक जागे होऊ लागल्याची चाहूल चोरट्यांना लागली. त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, चोरट्यांची संख्या सहा ते सात असून ते साधारण २५ ते ३० वयोगटातील होते. त्यांनी चेहऱ्याला रुमाल बांधले होते आणि त्यांच्या हातात शस्त्रे असल्याचेही त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी परिसरात चोरट्यांचा शोध घेतला; मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. गुरुवारी सकाळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि पोलीस उपनिरीक्षक सरगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दहशतीमागे नेमके कारण काय?
दरम्यान, भाजपा नेते प्रा. बंडा गोडसे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांच्यासह अन्य व्यक्तींनी विजय शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान, हा साधा चोरीचा प्रयत्न होता की अवैध व्यवसायाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांच्या तपासातूनच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
फोटो ओळ :
वडूज : घटनास्थळी भेट देऊन माहिती घेताना पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे.

0 Comments