Hot Posts

6/recent/ticker-posts

गोडोलीत उड्डाणपूल, करंजे नाक्यावर भुयारी मार्गाची चाचपणी


 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोडोलीतील साईबाबा मंदिर चौकात उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव करण्यात आला असून, करंजे नाका येथे करंजे-म्हसवे रस्त्यासाठी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाचा पर्याय तपासला जात आहे. यासह नवीन फिश मार्केट आणि छत्रपती शाहू महाराजांचे तख्त असलेल्या ठिकाणच्या शाहू उद्यानात शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याबाबतही प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले.

नगरपालिकेच्या वतीने गुरुवारी या विविध विकासकामांबाबतची सादरीकरणे करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही माहिती दिली.

गोडोलीतील साईबाबा मंदिर चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, संबंधित कामाचे सादरीकरणही करण्यात आले.

 करंजे नाका परिसरातील अपघातांचा प्रश्नही यावेळी गांभीर्याने मांडण्यात आला. करंजे-म्हसवे रस्त्यावर आतापर्यंत काही गंभीर अपघात झाले असून, त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. किरकोळ अपघातांची संख्याही मोठी असल्याने या ठिकाणी वाहतूक सुरक्षित करण्यासाठी भुयारी मार्ग करता येईल का किंवा उड्डाणपूल उभारता येईल का, याचा अभ्यास करण्यात आला आहे. यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याआधारे तयार केलेल्या प्रस्तावाचे सादरीकरणही गुरुवारी करण्यात आले.

शहराच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक वारशात भर घालणाऱ्या शाहू उद्यानात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. तसेच नवीन फिश मार्केट उभारण्याबाबतच्या नियोजनाचेही सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, राधिका रस्त्याचेही विस्तारीकरण व मजबुतीकरण प्रस्तावित असून गुरुवारी रात्री उशिरा खासगी ठेकेदारामार्फत या रस्त्याचे सर्वेक्षण सुरु होते. याच्या एकूण खर्चाचा प्रस्तावित आराखडा बांधकाम मंत्री भोसले यांच्यासमोर मांडला जाणार असून येत्या काळात राधिका रस्त्याचे भाग्यही उजळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.  वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती शक्यता आणि शहराच्या ऐतिहासिक वारशाचे जतन या तिन्ही बाबींचा विचार करून प्रस्तावित कामांना पुढील टप्प्यात गती मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments