Hot Posts

6/recent/ticker-posts

कृष्णा कारखान्याचा विनाकपात 3200 रूपयांचा उच्चांकी अंतिम दर जाहीर डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा; सभासदांना मोफत साखरेसह मिळणार 3300 रूपयांचा लाभ


कराड
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन वर्षात सुमारे 57 कोटींच्या मध्यम मुदतीच्या कर्जाची परतफेड करून आर्थिक स्थिरता आणली आहे. कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना यापूर्वीच 2950 रूपये अदा केले आहे. आता दिवाळीपूर्वी कोणतीही कपात न करता सभासदांना रोखीने 250 रूपये देण्यात येणार आहे. कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना मोफत साखरेबरोबरच विनाकपात 3200 रूपयांचा उच्चांकी अंतिम दर जाहीर केला असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांनी केली.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज (गुरूवारी) बोलत होते. यावेळी  श्री विठ्ठल रूक्मिणी मिंंदर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, कारखान्याचे व्हा. चेअरमन लिंबाजीराव पाटील, संचालक दयाराम पाटील, जगदीश जगताप, पै.शिवाजीराव जाधव, धोंडीराम जाधव, जितेंद्र पाटील, ब्रिजराज मोहिते, गुणवंतराव पाटील, पै.भगवानराव पाटील, दीपक जाधव, पांडुरंग होनमाने, पै.आनंदराव मोहिते आदी संचालक उपस्थित होते. या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, साखर उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे मागे पडला. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन ज्यादा झाले. आता महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना साखर उत्पादनात उत्तर प्रदेशबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. साखरेचे उत्पादन घटल्यामुळे त्याचा परिणाम साखरेच्या दरावर झाला साखरेला चांगला दर वाढून मिळाला. राज्यातील साखर कारखाने 365 दिवसांपैकी 110 दिवस चालले. त्याचा परिणाम अल्कोहोलसह वीजनिर्मितीवर झाला. असे असले तरी शेतकर्‍यांना मात्र ऊसाला दर चांगला मिळाला आहे. असे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षात कृष्णा कारखान्याला आर्थिक स्थिरता प्राप्त झाली आहे. इतर कारखान्यांबरोबर स्पर्धा करण्याइतपत आपली क्षमता तयार झाली आहे. दोन वर्षात कामगारांच्या ग्रज्यूटीचे 10 कोटी,  तोडणी वाहतूक कामगारांची 21 कोटी असे एकूण 57 कोटी रूपयांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाची परतफेड कारखान्यांनी केली आहे. मागची सर्व देणी कारखान्याने दिली असल्याचे डॉ.सुरेश भोसले यानीं सांगितले.
कारखान्याच्या आधुनिकीकरणाचे  काम व्यवस्थापनाने हाती घेतले आहे. 1960 सालातील 80टक्के मशिनरी आजही कार्यान्वित आहेत. कारखाना आधुनिकीकरणासाठी 30 कोटी खर्च आला आहे. कारखान्याची गाळप क्षमता 10 हजार मेट्रीक टन असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कारखान्याची वाटचाल सुरू आहे. येत्या 1 - 2 वर्षात कारखाना 10 हजार क्षमतेने गाळप करताना दिसणार आहे. नवीन डिस्लरीच्या आधुनिकीकरणाचे काम कारखान्याने हाती घेतले आहे तेही 3-4 महिन्यात पूर्ण होईल. गत हंगामात कारखान्याला 1270 इतका उच्चांकी उतारा मिळाला होता याशिवाय चालू हंगामा पासून कारखान्याने मोबाईल अ‍ॅपद्वारे ऊसाची नोंदणी सुरू केली आहे.
 वाहतुकीची समस्या मिटवण्यासाठी कारखाना कार्यस्थळावरील गाडीतळ कारखान्याने नुकतीच खरेदी केलेल्या साडेसहा एकर जागेवर  डेव्हलप करून त्याठिकाणी हलवण्यात येणार आहे. याशिवाय प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारखान्याला डिस्लरी प्रकल्प बंद करावा अशी नोटीस बजावली होती. त्यानुसार कारखान्याने प्रदुषण नियंत्रणासाठी यंत्रणा बसवली असून  प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सर्व शर्ती पूर्ण केल्या आहेत. 15 हजार लिटर क्षमतेचा असलेल्या इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढवून ती आता 60 हजार लिटर इतकी केली आहे. बायोगॅस प्रकल्पाचीही दुरूस्ती कारखान्याने गेल्यावर्षी केली आहे.32  लाख घनमीटर इतका बायोगॅस तयार केला आहे. त्यामुळे दिवसाला 80 ते 100 टन इतक्या बायोगॅसची बचत होणार आहे. बायो फर्टीलायजर लॅब, बायो पेस्टीसाईट लॅब याद्वारे  शेतकर्‍यांचे हित साधले जाणार असल्याचे डॉ.भोसले यांनी सांगितले.
ऊस उत्पादन वाढविणे, नवीन  कॉलनी तयार करणे, साखरेसाठी दोन नवीन गोडावून बांधणे यासह  कारखान्याच्या हिताचे निर्णय घेत. सभासदांना मोफत साखरेबरोबरच दिवाळीपूर्वी विनाकपात रोखीने 250 रूपये सभासदांच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा यावेळी डॉ.भोसले यांनी केली याशिवाय सभासदांच्या सूचनेलाही त्यांनी सर्मपक उत्तरे दिली.
डॉ.अतुल भोसले म्हणाले पूर्वजांच्या कष्टामुळे  महाराष्ट्रातील सक्षम असा कृष्णा कारखाना उभा राहू शकला. जयवंतराव भोसले यांच्या कारकिर्दीत 30 वर्ष कारखान्याने महाराष्ट्रात उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न केला. मात्र  गेल्या दोन वर्षापूर्वी कारखान्याची 3 पॅनेलमध्ये रंगतदार निवडणूक झाली. यासंघर्षातून सभासदांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलला पसंती दिली. कृष्णा कारखान्या सारख्या चांगल्या सुविधा इतर कुठलाच कारखाना देवू शकत नाही असा दृढ विश्‍वास सभासदांच्या मनात निर्माण झाला आहे. या कारखान्यावर श्रीविठ्ठलाचा आशीर्वाद आहे. म्हणून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीवर आपली अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. कारखान्याने कृष्णाकाठावरील वारकर्‍यांसाठी  कारखाना कार्यस्थळावरील गणपती मंदिरा शेजारी वारकरी भवन उभा करावे जेणेकरून भजन किर्तनाद्वारे या परिसरात भक्तीभाव निर्माण होईल अशी मागणी डॉ.अतुल भोसले यांनी केली.
मागील सभेचा वृत्तांत मुकेश पवार यानीं वाचून दाखवला. या सभेत मोठया संख्येने सभासद उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments