सातारा
प्राथमिक शिक्षक बँकेची सभा म्हटलं की गोंधळ. ‘गुरुजी तुम्हीसुद्धा’, असे म्हणण्याची वेळ असे समीकरण असताना अलीकडच्या काही वर्षात चेअरमन बलवंत पाटील यांच्या पारदर्शक कामकाजामुळे गोंधळ कमी झाला आहे. गेल्यावर्षीही काही संघटनांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला पण, चेअरमन पाटलांनी तो हाणून पाडला. या सार्या पार्श्वभूमीवर रविवारी बँकेची वार्षिक सभा होत आहे. या सभेवरही निषेधाचे सावट असून सभा यशस्वी होणारच असून त्यासाठी पाटलांचा कस लागणार आहे.
शिवाजीराव-संभाजीराव गटात दुही?
गतवर्षी संभाजीराव व शिवाजीराव हे दोन्हीही गट एक होते. मात्र, शिवाजीराव यांचा गट उघडउघड निदर्शने करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सभेबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.
नुकत्याच झालेल्या सहविचार सभेत शिवाजीराव पाटील गटाने काळ्या फिती लावून निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारच्या सभेत संभाजीराव गट विरुद्ध शिवाजीराव गट आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.
शिक्षक बँकेत शिवाजीराव पाटील आणि संभाजीराव थोरात यांच्या गटाची सत्ता आहे. गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी गटात मानपान नाट्य सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. पाटील गटाच्या सहविचार सभेत ही बाब प्रकर्षाने जाणवली. रविवारच्या सभेत काळ्या ाजफती लावून निषेध करण्याचा निर्णय या सहविचार सभेत घेण्यात आला.
2015 साली परिवर्तन होऊन शिक्षक संघाच्या 21 पैकी 17 जागा निवडून आल्या. सत्तेत अडीच वर्षे चेअरमन पद हे पाटील गटाला तर अडीच वर्षे थोरात गटाला देण्याचे ठरले होते. परंतु या विभागणीच्या नियमाला बगल देत थोरात गटातील काहींनी फोडाफोडीचे राजकारण केले. पाटील गटाचे 3 संचालक त्यांनी फोडले व सत्ता ताब्यात घेतली. बँकेच्या म्हसवड शाखेचे नूतनीकरण व कराड शाखा उदघाटन कार्यक्रमात माजी आमदार शिवाजीराव पाटील यांना निमंत्रण नव्हते. या कारभारामुळे पाटील गटात खदखद आहे. त्यामुळे शिवाजीराव पाटील गटाच्या संचालकांनी काळ्या फिती लावून निषेध करण्याचा निर्णय झालेल्या सहविचार सभेत निर्णय घेण्यात आला. त्या सहविचार सभेला जिल्हाध्यक्ष मच्छिन्द्र ढमाळ, सरचिटणीस प्रदीप घाडगे, विजयराव थोरात, कार्याध्यक्ष सुगंधराव जगदाळे, कोषाध्यक्ष राजेंद्र दगडे, संजय शेजवळ, बाळासाहेब साळुंखे, संचालक तुकाराम कदम , ज्ञानेश्वर कांबळे, महेंद्र अवघडे, सौ. निर्मला बसागरे हे उपस्थित होते.
समितीची गोपनीय बैठक
नोकर भरती, दिलेली कर्ज प्रकरणांवरून माजी चेअरमन विठ्ठल माने यांच्यासह इतर मंडळींना सत्ताधारी गटाने गेल्या काही दिवसांत चांगलेच कोंडीत पकडले आहे. आता समिती नेमकी काय भूमिका घेणार याकडेही लक्ष असून गुरुवारी बँकेत समितीच्या शिक्षक सभासदांची गोपनीय बैठक झाल्याचे समजते.

0 Comments