Hot Posts

6/recent/ticker-posts

मायणीकरांची तहान कधी भागणार नेते राजकारणात, युवक बेरोजगारीत अडकले


विजय झोडगे
मायणी
राजकारणाचे समीकरण समाजकारणाला सोज्वळ पणे जोडलेले सर्वत्र पहावयास मिळते आणि खटाव तालुक्यातील मायणी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावचे राजकारण गेल्या 50 वर्षात फक्त न फक्त पाण्यासाठीच तहानलेले पहावयास मिळाले आहे . राजकारणाच्या पलीकडे आणि विशेषत: पाणीप्रश्‍नाचे तुणतुणे येथील नेते सातत्याने वाजवत असतात. परिसरात वाढत असलेल्या बेरोजकारीकडे झालेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे येथील युवक देशोधडीला लागले आहेत.
माजी आमदार स्वर्गीय केशवराव पाटील यांच्या खटाव या गावातून तालुक्याच्या राजकारणाचा चालणारा गाडा त्यांचेच शिष्य स्व. भाऊसाहेब गुदगे (काका)यांच्या आमदारकीच्या रुपाने मायणी या गावाकडे आला. त्यानंतर मायणी राजकीयदृष्ट्या मातब्बर झाली. स्व भाऊसाहेब गुदगे यांनी दुष्काळाचा व अडचणींचा विचार करीत कालानुरूप विकासाची गाडी सुरू केली. त्यांच्या कार्याचा सर्वोच्चबिंदू म्हणजे खटाव तालुक्याला जीवनदायी ठरणारे उरमोडी चे धरण! यामुळेच त्यांना उरमोडीचे जनक मानले जाते.
2004 साली स्व भाऊसाहेब गुदगेंची आमदारकी संपून विधानसभा निवडणुकीत पश्‍चिम महाराष्टातील एकमेव भाजपचा उमेदवार म्हणून डॉ दिलीपराव येळगांवकर हे निवडून आले. परंतु, तत्कालीन विकास तिजोरीच्या चाव्या आघाडी सरकारकडे असल्याने डॉ येळगांवकर यांचा प्रयत्न काहीसा तोकडा पडलेला दिसला. तरीही सत्ताधारी सरकारला जाब विचारणारा नीडर व आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
2009 च्या ऐतिहासिक मतदारसंघ बदलानंतर झालेल्या निवडणुकीत खटाव व माण या पूर्वीच्या मतदारसंघाचे डॉ दिलीपराव येळगांवकर,व स्व सदाशिव तात्या पोळ या आमदारांच्या साम्राज्याला उध्वस्त करीत माण तालुक्यातील प्रथमच विधानसभा निवडणूक लढवणारे  जयकुमार गोरे हे निवडून आले आणि मायणीतील पंचवीस वर्षाचा आमदारकीचा गाडा माण तालुक्यात गेला.तो 2014 च्या निवडणुकीतही हलला नाही.

राजकारण बनले खुनशी
या सर्व वर्षात मायणीच्या राजकारणात निवडणूक होत गेल्या, संघर्ष, जाळपोळ, मारपीट, दंगे, आश्‍वासनांचा पाऊस पडत गेला. आपल्या नेत्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी कार्यकर्ते लढत गेले, भिडत गेले, खटले भरले गेले आणि कोर्टाच्या तारखा पडत गेल्या. परंतु मूळ प्रश्‍नाकडे दुर्लक्ष होऊन मायणीतील राजकारण खुनशी व आक्रमक बनले होते.याचा फटका अनेक युवकांना बसला.
कोर्टाची पायरी नकोरे बाबा...
सध्या कोर्टाच्या पायर्‍या चढून पश्‍चाताप करणारे जेष्ठ कार्यकर्ते आज आपल्या मुलांना राजकारणापासून दूर राहा असे सल्ले देताना दिसत आहेत. परंतु त्यामुळे सध्या सुशिक्षित युवक वर्ग संघर्ष पासून दूर दिसत असला तरीही राजकारणातील मताच्या बेरजेसाठी ठराविक पार्टीचा शिक्का त्यांच्या माथी मारण्याचे काम होताना दिसत आहे .
युवा मतदारांची ताकद निर्णायक
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर युथ क्लब ची स्थापना करून युवा वर्गाला आकर्षित करण्यात गुदगे गट यशस्वी ठरला होता. यामुळे युवा मतदारांची संख्या निवडणुकीत निर्णायक ठरते हे जिल्हा परिषदेच्या  निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे .
युवक वळले वाळूधंद्याकडे
खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदायी ठरणार्‍या योजना पूर्णत्वाला नेण्यात येतील, पाणी या भागाला मिळेल हे आश्‍वासन ऐन जवानी च्या काळात ऐकलेले लोक आज वृद्धत्वाला पोहचले. परंतु, या योजनेचे पाणी आजवर या भागाला मिळाले नाही आणि येथील युवक शेतकरी आपल्या शिवारात भरघोस उत्पन्नाची शेती करू शकला नाही . सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपले शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करून नोकरीच्या जागांच्या तुलनेत तरुणांची संख्या जास्त असल्याने सध्या गावाकडील युवक सध्या बेरोजगार होऊन किरकोळ उद्योग नाहीतर ,वाळू व्यवसाय किंवा अन्य अवैद्य व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत.
लोकप्रतिनिधींचे अपयश...
मायणी हे गाव अनेक वर्ष राजकीय शक्ती स्थळ म्हणून गौरवले असले तरी या भागात आजवर कोणतीही औद्योगिक वसाहत निर्माण झाले नाहीत. आणि त्या धर्तीवर कोणतेही मोठी रोजगाराची संधी याठिकाणी निर्माण झाली नाही. हे येथील लोकप्रतिनिधी चे एक प्रकारे अपयशच म्हणावे लागेल.
एकत्र येण्याची गरज
कराड येथून सुरु होणारी टेंभू योजना शंभर ते दीडशे किलोमीटरवरील सांगोला ,आटपाडी भागातील लोकांची तहान भागावते आहे परंतु या कराडपासून फक्त 50 किमीवरील मायणी च्या सीमेवरून जाणारे टेंभू योजनेच्या भरलेल्या कालव्याकडे पाहण्या पलीकडे मायणी व या भागातील जनता काहीच करू शकत नाही. टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात येणार एक एकर शेती असणार्‍या शेतकरीही मोठे उत्पन्न मिळवताना दिसत आहे परंतु मायणी व या दुष्काळी भागातील सुशिक्षित बेरोजगार दहा एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असूनही पाण्याविना कोरड्या जमिनीकडे पाहण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही,त्याला मुंबई पुणे या मोठ्या शहरात रोजगार शोधण्यासाठी जावेच लागते.
एकमेकांची जिरवा जिरवीत धन्यता मानणार्‍या राजकीयनेत्यांची यंदाची ग्रामपंचायत निवडणूक नेहमीच्या चुरशीची आणि मोठ्या संघर्षात पार पडेल .कोणी पक्ष विजयी ठरेल ,कोणत्यातरी पक्षाचा पराजय होईल परंतु या दुष्काळी भागातील पाणी योजना पूर्ण करण्यासाठी,व येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी हा पारंपरिक संघर्ष संपवून या भागाचे भवितव्य उज्वल करण्यासाठी एकत्र येण्याची खरी गरज आहे.

Post a Comment

0 Comments