Hot Posts

6/recent/ticker-posts

दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकरचे ‘चॅटिंग’


मुंबई,
कुख्यात दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल  कासकर एकमेकांशी ‘चॅट’च्या माध्यमातून संपर्कात होते, अशी नवीन माहिती समोर आली आहे.
इक्बालला अटक झाल्यापासून एकामागोमाग एक खुलासे होत आहेत. तपासादरम्यान इक्बाल कासकरचे जीमेल अकाऊंट पोलिसांच्या हाती लागले आहे. इक्बाल कासकरला ठाणे गुन्हे शाखेने एका खंडणी प्रकरणात अटक केली आहे. पोलिसांची मोबाइल फोनवर सतत नजर असल्याने दाऊद आणि इक्बाल कासकरने हा मार्ग अवलंबला होता, असा खुलासा झाला आहे.
पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले आहे की, पोलिसांच्या हाती इक्बाल कासकरचे जीमेल अकाऊंट लागले आहे. आम्ही गूगलकडे पासवर्ड आणि इतर माहितीही मागितली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जीमेलचा तपास केल्यानंतर आणखी महत्त्वाचे पुरावे हाती लागतील अशी पोलिसांना अपेक्षा आहे. यामुळे दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकरभोवती फास आवळण्यास मदत मिळेल. इक्बाल कासकरच्या मोबाइल फोनची तपासणी केली असताना पोलिसांना या जीमेल आयडीची माहिती मिळाली. चौकशीदरम्यान इक्बाल कासकरने पोलिसांना सांगितले की, मेल अकाऊंट माझ्या मुलाने तयार केले आहे आणि पासवर्ड फक्त त्यालाचा माहिती आहे. मला मेल अकाऊंट वापरता येत नाही असा दावा इक्बाल कासकरने केला आहे. मात्र पोलिसांना त्याच्यावर विश्‍वास नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल कासकर मेल आणि इंटरनेटच्या सहाय्याने दाऊदसहित कुटुंब आणि अंडरवर्ल्डमधील इतर सदस्यांच्या संपर्कात होता. इक्बाल कासकरच्या मेलशी संबंधित सर्व लोकांवर पोलिसांची नजर आहे. सोबतच इक्बाल कासकरची एकपेक्षा जास्त ई-मेल अकाऊंट्स असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ठाणे पोलिसांचे सायबर सेल जीमेलवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत आहे.
इकबाल कासकरने पोलिसांना याआधी माहिती दिली होती की, फोन टॅप होत असल्याच्या भीतीने दाऊद गेल्या तीन वर्षांपासून माझ्याशी आणि इतर नातेवाईकांशी बोलणे टाळत आहे. मात्र आपण आपला दुसरा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचा दावा त्याने केला होता. आपल्या आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरून अनीस ईद आणि इतर सणांना फोन करतो, असे इक्बाल कासकरने सांगितले होते. इकबाल कासकर तपासात सहकार्य करत नसून बोलण्यास नकार देत आहेत. मात्र, त्याने आपण 1993 स्फोटातील आरोपी आपला मोठा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचे मान्य केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments