म्हसवड, 18 सप्टेंबर-
येथील आंबेडकर नगर येेथे कचरा भरलेला ट्रॅक्टर उभा होता. दोन दिवसांपासून हा कचरा पडून असल्याचा आरोप करत नगरसेवक अकिल काझी यांनी ट्रॅक्टर पालिकेपुढे आणून पालिकेच्या दारातच कचर्याचे डंपिंग केले. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने म्हसवडमध्ये जोरदार खळबळ उडाली. कचरा भरलेला ट्रॅक्टर दोन-तीन दिवसांपासून तेथे उभा होता, असा काझींचा आरोप आहे तर रविवारी सकाळीच पंतप्रधानांच्या वाढदिनी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेवेळी सदरचा कचरा डेपोकडे नेत असताना डिझेल संपल्याने ट्रॅक्टर बंद पडल्याने तेथे उभा होता, अशी सत्ताधारी प्रशासनाचा प्रत्यारोप असून या प्रकरणाने म्हसवडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
स्वच्छता अभियानाला गालबोट
देशाचे पंतप्रधान हे संपुर्ण देशात स्वच्छता अभियान राबवत असुन त्यामध्ये देशातील सर्व खासदार आमदार, मंत्री समाजीक संघटना यासह सर्व पदाधिकार्यांचा समावेश केला जात आहे, या सर्वांच्यामुळे देशातील राज्या राज्यात स्वच्छता अभियान राबवले जात असुन ठिकठिकाणी स्वच्छतेचे दूत निर्माण केले जात आहेत असे असताना म्हसवड शहरात मात्र नेमकी याऊलट घटना घडली. पालिकेच्या स्वच्छता अभियानाला पालिकेतीलच विरोधी गटाच्या नगरसेवकांने गालबोट लावल्याने शहरात खळबळ उडाली.
म्हसवड नगरपरिषदेच्यावतीने शहरातील कचरा उचलण्यासाठीचा ठेका देण्यात आला आहे. ठेकेदार शहरातील गल्लीबोळातुन आपल्या कर्मचार्यांकडून दररोज घरगुती कचरा गोळा करण्याचे काम करीत आहे. रविवारी दि.17 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त म्हसवड शहरात पालिकेच्यावतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा हा स्वच्छता ठेकेदाराच्या ट्रँक्टरच्या ट्रॉलीत भरुन ती ट्रॉली पालिकेच्या डंपिंग ग्राउंडवर घेऊन जात असताना त्या ट्रॅक्टरमधील डिझेल संपल्याने तो ट्रॅक्टर येथील आंबेडकर नगर येथे उभा करण्यात आला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटत असल्याचे कारण पुढे करीत या प्रभागातील नगरसेवक अकिल काझी यांनी माजी नगरसेवकाला सोबत घेत तो कचरा भरलेला ट्रॅक्टर थेट पालिका कार्यालयासमोर रवीवारी रात्री 9 च्या सुमारास आणून पालिकेसमोरच कचरा ओतण्यात आला.
सोशल मीडियावर काझींविरोधात संताप
सर्व शहरात हा प्रकार निंदनिय असल्याचा सूर उमटला तर सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाल्यावर त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी तातडीने रात्रीच पालिका कार्यालय गाठत तेथे टाकण्यात आलेला कचरा हा पालिका कर्मचार्यांकडून उचलला. मात्र, सदर प्रकार हा निंदनिय असून विरोधी गटाला आमच्या विरोधात कोणताच मुद्दा उपस्थित करता येत नसल्यानेच आज तोल सुटलेल्या विरोधकांनी हे निंदनिय कृत्य केले असल्याचे नगराध्यक्ष तुषार विरकर व स्वच्छता सभापती हिंदमालादेवी राजेमाने यांनी सांगीतले.
काझी, सोनवणेंविरोधात गुन्हा
दरम्यान सदर कृत्य करणार्याच्या विरोधात पालिकेच्या वतीने पालिका लिपीक सुनिल माडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन म्हसवड पोलीसांनी नगरसेवक अकिल काझी व माजी नगरसेवक संजय सोनवणे यासह ट्रँक्टर चालक उमेश कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख हे करीत आहेत.


0 Comments