Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रसंगी भाजपाशी हातमिळवणी : कमल हसन


चेन्नई, 26 सप्टेंबर
वेळप्रसंगी भाजपाशीही हातमिळवणी करण्यासाठी आपण तयार असल्याचे, चित्रपटानंतर आता आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करण्यासाठी सज्ज असलेल्या अभिनेता कमल हसन याने म्हटले आहे.
ज्यामुळे लोकांचे भले होणार असेल तर आपण कोणतीही सीमा गाठण्यासाठी तयार आहोत, मग त्यासाठी भाजपाशी हातमिळवणी करायची असो किंवा चित्रपटसृष्टी सोडायची असो, असे कमल हसन यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांनी यावेळी अनेक प्रश्‍नांची उत्तर देत आपल्या भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. कमल हसन यांनी भाजपासोबत जाण्यासंबंधी विचारले असता सांगितले की, माझ्या विचारांमध्ये जर अडथळा येणार नसेल आणि प्रशासनाशी संबंधित असेल तर नक्कीच मी त्यांच्यासोबत जाईन. तुम्हाला कुठेतरी राज्याच्या भल्याचा विचार करावा लागतो. माझी विचारधारा त्यांना योग्य वाटते की नाही हे मला माहीत नाही. पण लोकांचे भले होणार असेल तर अस्पृश्य असे काही नसते.

तुम्ही राजकीय पक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यामागे कारण काय असे यावेळी विचारले असता त्यांनी सांगितले की, गेल्या खूप दिवसांपासून हे डोक्यात होते. हा मोठा निर्णय आहे. संताप हा त्यामधीलच एक भाग आहे. जर तुम्ही नक्षलवाद्याला विचारले तर संताप तर असतोच, पण त्यामागे एक विचारधाराही असते, असे त्यांनी उत्तर दिले.
विशेष म्हणजे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कमल हसन यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. या पृष्ठभूमीवर कमल हसन यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यांच्या विवेकवादी भूमिकेबद्दल विचारले असता कमल हसन म्हणाले की, माझ्यामते विवेकवादी असणे म्हणजे मंदिर उद्ध्वस्त करणे नव्हे. तुम्ही रात्रीतून कोणाच्याही श्रद्धेला नष्ट करू शकत नाही, ते आपोआप होईल, असे त्यांनी सांगितले. माझी विचारधारा सर्वश्रुत आहे. काही मार्क्सवादी आणि समाजवाद्यांचा मी चाहता आहे. त्यातले काही यशस्वी आहेत तर काही अपयशी ठरलेले आहेत. ते कुठे अपयशी ठरले हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. पण म्हणून डावी विचारधारा सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही. मी केवळ थोडीशी तडजोड करतोय्, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या गोमांसासंबंधीच्या धोरणाविरोधात मी सरकारविरोधात आवाज उठविला आहे. मी जेवणात नेहमी गोमांस घेत होतो. आता मी ते थांबवले आहे. पण याचा अर्थ असा नाही की इतरांनी गोमांस खाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस किंवा द्रमुकमध्ये प्रवेश करणार का, असा सवाल त्यांना करण्यात आला तेव्हा, मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. अशा लोकांसोबत मला जायचे नाही. त्यांच्यासोबत जाणे म्हणजे चुकीचे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. मला तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनायचे नाही. केवळ मीडियाच तसे म्हणत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या मी ग्रामीण भागात राहतो. त्यामुळे निवडणूक लढवण्याची वेळ आली तर ग्रामीण भागातूनच मी निवडणूक लढवेन. पण सध्या तरी काहीच सांगता येत नाही, असेही त्यांनी सांगितले. राजकारणात प्रवेश केल्यावर मी सिनेमात काम करणे सोडून देईन. सिनेमात काम करायचे सोडणे माझ्यासाठी खूपच वेदनादायी असेल, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.


Post a Comment

0 Comments