दौंडेवाडीतील प्रकार, जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष, शासनआदेशाला कोलदांडा
सत्यसह्याद्री
खटाव तालुक्यातील दौंडेवाडी येथे काही नागरिकांनी शौचालयाचे ड्रेनेज सार्वजनिक आडात सोडले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाचा आदेश असतानाही त्याला कोलदांडा घालत याकडे जिल्हा परिषद प्रशासाने आणि ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यानेच ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
एक वर्षांपूर्वी ग्रामपंचायत गादेवाडीच्या हद्दीतील दौंडेवाडी येथे चार नागरिकांनी आपल्या वैयक्तिक शौचालयाचे ड्रेनेज दमदाटीने आणि अतिक्रमण करून सार्वजनिक आडात सोडले. याबाबत तेथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांनी याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यानंतर त्यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवरून थेट महाराष्ट्र सरकारकडे तक्रार केली. त्यावर शासनाने प्रकरण मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेला आदेश दिले.
त्यानंतर जिल्हा परिषदेने पंचायत समिती मार्फत तसेच आरोग्य विभागामार्फत अहवाल मागवून जाधव यांचे अर्ज निकाली काढले. तरीही जाधव यांनी पाठपुरावा करत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार जिल्हा परिषदेने जून महिन्यात ग्रामसेवकासह शौचालयधारकांचे जबाब घेतले. पावसाचे दिवस व आर्थिक परिस्थितीचे कारण या शौचालयधारकांनी दिले होते. तसेच चंद्रकांत शिवाजी गायकवाड यांच्या घरासमोर बोअर असल्याने तातडीची मागणी पूर्ण केली होती. मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तातडीने शोषखड्डा घेण्याचेही मान्य केले होते.
सदरचा आड खुला केल्यास आडामध्ये मैलामिश्रीत पाणी असल्याने दुर्गंधी पसरेल, असा अहवालही ग्रामपंचायतीने दिला असून सुनावणीवेळी शौचालयधारकांनी 20 जून रोजी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल. जे. चव्हाण यांच्यासमोर आडामध्ये ड्रेनेज न सोडण्याचे मान्य केले होते. त्यानंतर 10 दिवसांत हे पाणी बंद न केल्यास कारवाई करण्याचा इशारा खटाव पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी लेखी आदेशाद्वारे दिला होता.
मात्र, या आदेशाला कोलदांडा घालत अद्यापही हे ड्रेनेज याच आडात सोडले जात आहे. या कारभारामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीने हे ड्रेनेज बंद न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

0 Comments