सातारा : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत सातारा जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला आहे. जिल्ह्यात भाजपचे अकरा सरपंच आणि 59 सदस्य बिनविरोध झाल्याचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी स्पष्ट केले आहे.
सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात बहुतांशी ग्रामपंचायतीत आतापर्यंत राष्ट्रवादी, कॉंग्रेस अंतर्गत निवडणूक होत होती. पण काही ठिकाणी राष्ट्रवादीचा दुसरा गट शिवसेना, कॉंग्रेस किंवा भाजपशी हात मिळवणी करून स्थानिक पातळीवर सत्तेची सूत्रे मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. पण अलिकडे सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवर संघटन मजबूत केल्याने ग्रामपंचायत पातळीवरही त्यांचे सदस्य व सरपंच निवडून येण्यास मदत झाली आहे. यावेळेस जिल्ह्यातील सर्व सरपंच पदे व निम्म्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीत भाजपने स्थानिक गटाला एकत्र करून पॅनेल टाकली आहेत. उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 52 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी 11 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाने दावा सांगितला आहे. यामध्ये 11 सरपंच आणि 59 ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. माणमध्ये तीन सरपंच, 13 सदस्य, कऱ्हाड उत्तर पाच सरपंच 26 सदस्य, जावलीत दोन सरपंच 13 सदस्य, पाटण दोन सदस्य, खटाव एक सरपंच आणि पाच सदस्यांचा समावेश आहे.

0 Comments