Hot Posts

6/recent/ticker-posts

सोच बदलो ....




लाईट बिल हे प्रत्येक घराला .. प्रत्येक महीन्याला भरावं लागतं . आज सकाळी सकाळचे सगळे श्रोपस्कार उरकल्यावर आमच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिला .. तेवढं लाईट बिल भरून टाका . १०/१२ दिवस झाले आलेलं आहे आणि त्यांना वेळ मिळाला नव्हता .. कारण सुद्धा योग्य होतं ! मुलांची दिवाळी पुर्वीची परिक्षा सुरू असल्यामुळे थोडी धावपळ होणं स्वाभावीक आहे . 
झालं .. बिल भरायला जवळच्याच सहकारी बँकेत गेलो . पावणे दहा वाजले होते . आतला कर्मचारी आलेला होता . मी आवाज दिला .. 
मी :- अहो साहेब खिडकी उघडा की .. बिल भरायचं आहे . 
तो !:- ( आतून ) थांबा जरा .. आजून दहा वाजले नाहीत . दहा वाजता सुरू होईल !
मी :- साहेब तुम्ही तर आला आहात .. मग करा की सुरू ? 
तो :- मी आलो तर काय झालं ? दहा वाजताच सुरू करणार .. उभे रहा लाईनीत ! 
( १५/२० माणसं झाली होती लाईनीत . हळूहळू वाढत होती . एकदाचे दहा वाजले . मी बिल आत सरकवलं ! कंम्प्युटरवर खाडखुड करत पावती मला दिली आणि .. )
तो :- बाजुला थांबा .. सुट्टे पैसे नाहीत ! ( ८३० रुपये बिल होतं . मी पाचशेच्या दोन नोटा आणि सुट्टे तिस रुपये दिलेले होते .. त्याला मला दोनशे रुपये द्यायचे होते )
मी :- साहेब ही बँक आहे . थोडे सुट्टे पैसे घेवून बसत जा ना ? एकतर तुम्ही आल्या आल्या बिल घ्यायला सुरुवात केली असती तर एवढी लाईन पण वाढली नसती . आणि सुट्ट्या पैशासाठी आणखी थांबवताय .. हे योग्य आहे का ? देश बदलला पाहिजे म्हणून आपण सगळे नुसती बोंब मारत असतो .. स्वतः बदलुया ना ! आल्या बरोबर बिल घ्यायला सुरुवात केली असती तर तुमचं काही नुकसान झालं असतं का ? 
तो :- ( पटकन शंभराच्या दोन नोटा काढून देतो ) हं .. घ्या निघा आता ! 
मी :- आता कुठून आले सुट्टे ? मुद्दाम नाटक करून काय साध्य करता ? तुम्ही कर्मचारी अशाप्रकारे आडमुठेपणाने गर्दी वाढवता .. आणि मग एखादी दुर्घटना घडते . मरतोय बिचारा सामान्य माणूस ! जरा स्वतःला बदला .. तरच देश बदलेल ! ( तो आेळखून गेला आणि निरूत्तर झाला . लाईनीतल्या सगळ्यांना आता धिर आला होता . सगळे मोठमोठ्याने आेरडायला लागले होते .. त्या सिस्टीम विरोधात ) 
आणि मी एखाद्या विजयी खेळाडू सारखा घरी निघालो . जाताजाता माझ्या डोक्यात विचार आला .. हेच बिल मी आॅनलाईन भरले असते तर ? खरंच .. तो जेवढा दोशी आहे .. मी सुद्धा तेवढाच दोशी आहे . कारण मी सुद्धा बदलु शकतो .. आपण सगळे .. या बिलाच्या लाईनीत उभे राहणारे बदलु शकतो स्वतःला ! सगळ्यांनीच प्रत्येक महीन्याला भरायची सगळी बिलं आॅनलाईन भरली तर .. आपण सुद्धा ही .. गर्दी .. पर्यायाने एखादी चेंगराचेंगरीची दुर्घटना टाळू शकतो ! म्हणूनच माझ्यासकट सर्वांनी आपली .. सोच बदलली तरच देश बदलणार आहे ! नाही तर .. ये रे माझ्या मागल्या .. हे सुरुच राहणार ! मग कुणीही मसीहा .. नाही बदलु शकणार देश ! 
     मित्रांनो .. थोडंसं विषयांतर करतो ! कालच गेलो होतो ट्रेनने वरळीला जाण्यासाठी . परेलला उतरलो ! परवाच्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे मळभ दाटून आले . एक नजर टाकली .. त्या पुलाकडं ! सगळं कसं शिस्तबद्ध चाललं होतं . दोन दोनच्या लाईनीत सगळे हळूहळू पुढे सरकत होते . कुणाचा कुणाला साधा स्पर्श सुद्धा होत नव्हता ! हिच परिस्थिती उतरणारांची होती . चार पाच पोलीस खाली .. चार पाच वर ! सगळ्यांना लाईनीत .. शांततेत चढ उतार करण्यासाठी अवाहन करत होते . बदल घडला होता .. पण अनेक जिवन प्रवाशांचा बळी घेवून ! हेच आपण आगोदर सुद्धा करु शकत होतो . ही शिस्त आपण आगोदर सुद्धा पाळू शकलो असतो .. पण नाही ! आपल्याला सवय झाली आहे .. कुणीतरी आपला जिव दिल्या शिवाय शहाणं न होण्याची ! 
   सवयी प्रमाणे माझ्या मोबाईलनं आपलं काम केलं ! दोन चार फोटो काढले . मी विचार करत होतो .. आज शिस्तबद्ध चाललेला हा पुल तोच का ? आणि चेंगराचेंगरी झालेला तो पुल बोलु लागला ....

 हो .. मी तोच आहे .. परवाचाच ! मी जरी बदललो नसलो तरी माणसा .. तुला बदलावंच लागलं ! अरे गर्दीत हरवलेल्या माणसा .. तुझी मरणासाठी चाललेली धावपळ जरा स्लो कर ! कित्येक वर्षापासुन मी असाच आहे .. एक दिवस मी सुद्धा मरणार आहे . तु सुद्धा मरणारच आहेस .. पण मरण्या आधी माझ्यासारखं जगून घे ! उगाच किडामुंगी सारखा मरु नकोस ! यातून धडा घे .. आणि सुरुवात स्वतःपासुन कर ! नुसता देश बदलेल .. देश बदलला पाहिजे म्हणून काहीही होणार नाही ! तु बदल तुलाच आदी ! देश आपोआप बदलेल ! परवाच्या दुर्घटनेनंतर तु सुरू केलेली ही शिस्त .. फक्त माझ्या पुरती मर्यादित नको ठेवु ! सगळ्याच गर्दीच्या ठिकाणी ही शिस्त पाळ ! 

विनायक देशमुख 

( एक जिवन प्रवासी )


Post a Comment

0 Comments