\
सातारा दि. 18 (जिमाका): शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून ही कर्जमाफी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे. या कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार असून त्यांचा सातबारा कोरा होईल, असा विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज व्यक्त केला.'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017' शेतकरी कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज पालकमंत्री श्री. शिवतारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक महेश कदम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राजेंद्र सरकाळे आदी यावेळी उपस्थित होते.या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असे सांगून पालकमंत्री श्री. शिवतारे म्हणाले, राज्यभरातून 56 लाख 59 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले हाते. ऑनलाईन अर्ज भरल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यालाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांमधून शेतऱ्यांचे जीवमान उंचविण्यास मदत होत आहे. शासनाने कर्जमाफी देण्यासाठी 3 वर्षे अभ्यास केला व योग्य वेळी कर्जमाफी दिली त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार 60 हजार, नियमित परतफेड करणारे 1 लाख 75 हजार तर पुनर्गठीत कर्जदार शेतकारी 15 हजार असे एकूण 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांना अंदाजे 490 कोटींचा लाभ मिळणार आहे. दि.2 व 3 ऑक्टोबर 2017 रोजी 1 हजार 190 गावांमध्ये याद्यांचे चावडी वाचन करण्यात आलेले आहे. ऑनलाईन अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची यादी पोर्टलवरही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी व त्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या अभियानाचा जास्त लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला आहे. तसेच दुष्काळी भागातही टँकरची संख्या कमी झालेली आहे. भविष्य काळात या कर्जमाफीचे परिणाम दिसून येणार असून शेतऱ्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल , असा विश्वासही पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी व्यक्त केला.यावेळी सहकारी परिषदेचे अध्यक्ष श्री. चरेगावकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादीत केलेल्या मालाला भाव मिळावा व त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. शेतकरी हा श्रीमंत झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे यासाठी केंद्र व राज्य शासनाने शेतकरी हा केंद्र बिंदू मानून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक महेश कदम यांनी केले. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.x
0 Comments