Hot Posts

6/recent/ticker-posts

सात पिस्तुलासह दोघे जेरबंद, सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, संशयित शिंदी व नागझरीतील


सांगली
सांगलीत शंभर फुटी रोडला विक्रीसाठी आणलेल्या सात देशी बनावटीची पिस्तुले आणि 27 जिवंत काडतुसासह दोघांना पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शंभर फुटी रोडवरील हाटेल जय मल्हारजवळ  ही कारवाई केली.  दोघेही सातारा जिल्ह्यातील आहेत. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
सनीदेव प्रभाकर खरात (वय 20,रा.शिंदी बुद्रुक, दहिवडी ता. माण, जिल्हा सातारा) आणि संतोष शिवाजी कुंभार (वय 27 रा.नागझरी ता.कोरेगाव जि.सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या पिस्तूल आणि काडतुसांची किंमत तीन लाख 55 हजार 400 रूपये असल्याचेही पोलीस प्रमुख शिंदे यांनी सांगितले. याबाबत माहिती अशी, शंभर फुटी रोडवर हाटेल जय मल्हारजवळ दोन युवक देशी बनावटीची पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेकडील कान्स्टेबल अशोक डगळे यांना सोमवारी मिळाली. त्यानुसार सोमवारीच सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी सापळा लावला होता. दोन युवक हातात वायरच्या पिशवीत काहीतरी घेऊन संशयास्पद फिरत असल्याचे दिसल्याने दोघांना पकडण्यात आले. झडती घेतली असता त्यांच्याकडे सात देशी बनावटीची पिस्तुले आणि 27 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल सापडला.
विश्रामबाग पोलीसात त्यांच्यावर आर्म्स अ‍ॅक्ट कलम 325 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपनिरीक्षक प्रवीण शिंदे तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नेतृत्वाखाली प्रविण शिंदे, डगळे, सावंत,जितेंद्र जाधव, अझर पिरजादे यांनी कामगिरी केली.
शस्त्रे सापडण्याची मोठी घटना
सनीदेव खरात आणि संतोष कुंभार हे दोघेही पोलीस रेकार्डवर प्रथमच आले आहेत. आजपर्यंत त्यांनी देशी बनावटीची अनेक पिस्तुले विकली आहेत. पण, ते रेकार्डवर आले नव्हते. त्याचबरोबर इतक्या मोठ्या संख्येने पिस्तूल सापडण्याची ही गेल्या वर्षभरातील ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी पिस्तुल आणली कोठून आणि सांगलीत कोणाला विकण्यासाठी आले होते. हे पोलीस तपासात निष्पन्न होईल अशी माहितीही अधीक्षक शिंदे यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments