सातारा / प्रतिनिधी
राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असून अजूनही काही मागण्या प्रलंबित आहेत. राज्य सरकार फक्त आश्वासने देत आहे आणि मराठा समाजाचा संयम पाहत आहे. आता थांबून चालणार नाही. सरकारने आमचा संयम पाहिला मात्र, रुद्रावतार कधी पाहिलेला नही. आगामी तीन महिन्यांत जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमची ताकद आणि रुद्रावतारही पाहण्यास तयार राहा,' असा सज्जड इशारा सातारा जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, औट्रोसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी दि. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सातारा येथे 'मराठा क्रांती मूक मोर्चा' काढण्यात आला होता. त्याची वर्षपूर्ती मंगळवारी झाली. त्याअनुषंगाने सातारा येथील स्वराज मंगल कार्यालयात झालेल्या या वर्षपूर्ती मेळाव्यात हजारो मराठा बांधवांची उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी जिजाऊ वंदना झाल्यानंतर मराठा मोर्चा वर्षपूर्तीनिमित्त तयार करण्यात आलेल्या डॉक्युमेंट्रीचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.
'मराठा क्रांती वर्षपूर्ती महामेळाव्यात' सुरेंद्र काकडे, राजंद्र कोंढरे, हेमंत बर्गे, सुरेश नलवडे, ॲड. अरविंद कदम त्याचबरोबर अन्य मान्यवरांनी आपली मते मांडली. उद्योग, शेती आणि शिक्षण तसेच पोलीस, सेना भरती यावर प्रामुख्याने मराठा समाजाने काय करावे, यावर विवेचन करण्यता आले. आपल्या मागण्यांसाठी आपली लढाई तर सुरूच राहणार आहे. मात्र, ही मागणी आम्ही करत असताना सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. आम्ही शांत, संयमी आहे याचा अर्थ कोणी वेगळा लावू नये. आमच्या मागण्यांसाठी आंदोलने, मोर्चा तर सुरूच राहणार आहे म्हणून आपल्याला शांत बसून चालणार नाही. आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. मराठा समाजाचे अस्तित्व आपल्याला दाखवायचे आहे.
आजपर्यंत मोर्चांच्या निमित्ताने एकत्र आलो आहे. आपण एकत्र राहून काम करण्याची आणि समाजाला न्याय मिळवून देण्याची परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे. त्यामुळे आता सरकारला देता की जाता असा इशारा देण्याची वेळ आली आहे. मराठा समाजाने आता स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करत वाटचाल करणे आवश्यक आहे. आपण मागतकरी होऊन चालणार नाही तर ते हिसकावून घेण्याची ताकदही दाखवावी लागणार आहे. आपापल्या गावात मराठा समाजाचे संघटन करा. आपली भूमिका समजावून सांगा. युवकांना मार्गदर्शन करा आणि उद्योग, व्यवसायावर चर्चा करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, वर्षपूर्ती महामेळाव्यात काही अन्य मागण्या करण्यात आल्या. आपण ज्या वीस मागण्या केल्या होत्या त्यापैकी नऊ मागण्या मान्य झाल्या आहेत. अजून अकरा मागण्यांसाठी आपल्याला सनदशीर मार्गान लढा उभारयचा आहे. सरकारने ज्या मागण्या मान्य केल्या आहेत त्याचा फायदा मराठा समाजाला मिळणे आवश्यक बनले आहे. ज्या मागण्या अपूर्ण आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मराठा समाजाची ताकद पुन्हा एकदा दाखवून द्यावी लागणार आहे. प्रस्तावित शासकीय मराठा विद्यार्थी वसतिगृह सद्यस्थिती आणि पाठपुरावा याचा आढावा देण्यात यावा, अशी मागणी करतच मराठा समाजाच्या अन्य काही मागण्या प्रलंबित असल्याच्या मुद्याकडेही लक्ष वेधण्यात आले.
पॉइंटर करणे
मराठा क्रांती वर्षपूर्ती महामेळाव्यात झालेले ठराव
- महिला, मुलींना स्वसंरक्षणासाठी मार्गदर्शन, प्रात्यक्षिक शिबिरांचे आयोजन करणे
- प्रत्येक शहरात विद्यार्थी सहायता कक्ष कार्यान्वित करणे
- समूहनिहाय विविध सेल तयार करणे
- विविध शासकीय योजना, सवलती संदर्भात माहिती देणे
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेबद्दल मार्गदर्शन
- स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, व्यवसाय मार्गदर्शन करणे
- पोलीस आणि सैनिक भरतीच्या अनुषंगाने कार्यशाळा घेणे
चौकट करणे
आपली व्यथा कचरापेटीत टाका
मराठा समाजाने आता आपली व्यथा मांडून रडत बसू नये तर त्याने आपला स्वाभिमान दाखवून मागण्या मान्य करून घ्याव्या लागणार आहेत. आपली व्यथा कचरपेटीत टाकून पुढे जाऊ. यापुढील काळात आपण सर्वांनी मिळून रचनात्मक पध्दतीने काम करूया आणि आपण पुन्हा एकदा आपले साम्राज्य उभे करू. आपण सर्वाधिक लोक शेती व्यवसायाशी निगडीत आहे. हीच आपल्यासाठी संधी आहे. रोज दहा मराठा युवकांशी बोला आणि कृषी प्रक्रिया उद्योग उभा करण्याविषयी चर्चा करा, असे आवाहन यावेळी महामेळाव्यात करण्यात आले.
चौकट करणे
औट्रोसिटी नियंत्रण समिती स्थापन करणार
सातारा येथे मंगळवारी झालेल्या वर्षपूर्ती महामेळाव्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मराठा समाजाला भेडसावणाऱ्या नेमक्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या सोडविण्यासाठी काय करता येईल यावर विवेचन करण्यात आले. मराठा समाजातील वकील, डॉक्टर यांच्या समित्या स्थापन करण्यात याव्यात, असेही ठरवण्यात आले. यावेळी औट्रोसिटी नियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

0 Comments