Hot Posts

6/recent/ticker-posts

सिध्देश्‍वर कुरोली ग्रामसभेत पाणीप्रश्‍नावरुन खडाजंगी


2 कोटी निधी कोठे गेला, महिलांचा सवाल
सिध्देश्‍वर कुरोली 
येथे झालेल्या ग्रामसभेत पाणी टंचाईच्या मुद्यावरुन जोरदार खडाजंगी झाली. यावेळी पाणीटंचाईने हैरान झालेल्या संतप्त महिलांनी पाणी योजनेसाठी मंजूर झालेला सुमारे 2 कोटीचा निधी कोठे गेला ? असा सवाल उपस्थित करत पदाधिकारी व ग्रामसेवकांना धारेवर धरले.
ग्रामसभेस सरपंच प्रतिभा भंडारे, उपसरपंच मनोहर देशमुख, विस्तार अधिकारी श्री. पोतदार, पर्यवेक्षिका विमल काटकर, माजी सरपंच शहाजी देशमुख, प्रतापराव देशमुख, रेश्मा तानवडे, प्रमिला पाटोळे, डॉ. आशा ननावरे, चंद्रसेन देशमुख, संतोष भंडारे, किसन जाधव, श्रेयश वाडेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी 2 कोटी रुपयांची पाणी योजना होवूनसुध्दा आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नाही. योजनेचा पैसा नेमका कोठे मुरला का कोणाच्या घश्यात घातला. अशा प्रकारच्या प्रश्‍नांची सरबत्ती करत महिलांनी प्रशासनास धारेवर धरले. महिलांच्या प्रश्‍नावर उत्तर नसल्याने पदाधिकार्‍यांसह ग्रामसेवकांनी मौन बाळगणे पसंद केले. यावेळी झालेल्या चर्चेत सौ. तानवडे, सौ. पाटोळे यांच्यासह राजश्री देशमुख, स्नेहल गोसावी, वृंदा जोशी, अनघा जोशी, सुनिता घोडके, रजनी वाडेकर, आशा चव्हाण आदिंनी सहभाग घेतला. या सभेत कर्जमाफीसाठी बनविलेल्या 850 शेतकर्‍यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. तर अनेक वर्षे घरफळा न भरलेल्या लोकांची नांवे मोक्याच्या जागी फ्लेक्सवर लावण्याबाबतही ठराव करण्यात आला. यावेळी संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांना जबरदस्तीने काम करावयास भाग पाडल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी ग्रामपंचायत पदाधिकारी व युवक कार्यकत्यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून सिध्देश्‍वर मंदीर पटांगणात स्वच्छता मोहिम राबविली. तर सांगताप्रसंगी गांवचे सुपुत्र अ‍ॅड. सोमनाथ भरमगुंडे यांनी दक्षिण कोरीयात झालेल्या जागतीक शांतता परिषदेत सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी श्री. मदने यांनी प्रास्ताविक केले.

Post a Comment

0 Comments