Hot Posts

6/recent/ticker-posts

सातारा जि. प. शिक्षण सभापतीच्या चौकशीच्या आदेशाला ‘अर्थकारणाचे’ झाकण




कोणतेही सामाजिक काम नसतानाही अनेकांना आर्थिक निकषामुळे लोकप्रतिनिधी होण्याचे भाग्य लाभले. पण सुंभ जळला तरी पिळ....या म्हणीप्रमाणे काही लोकप्रतिनिधी स्वत:लाच ‘बुध्दीमंत’ समजून वागत असतात. अशांना समाज चाप लावतो. पाटण तालुक्यातील चाफळ परीसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार व त्यांच्या समर्थकांनी शिंगणवाडी ग्रामसभेत अतिक्रमण करून सभा उधळून लावली. या प्रकरणाची चौकशी व कारवाईची मागणी केल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. पण ‘अर्थकारणाचे’ झाकण मजबूत असल्यामुळे सध्या शिंगणवाडी ग्रामस्थ चौकशी केंव्हा पूर्ण होणार? असा सवाल सातारा जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांना ग्रामस्थ विचारू लागले आहेत. दरम्यान या आदेशाला जवळपास दोन महिने लोटले तरी कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. वेळ पडल्यास लोकप्रतिनिधी संहिता कायद्याच्या अनुषंगाने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत म्हावशी चाफळ परीसरातील ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले कि, पाटण तालुक्यात राजकीय संघर्षामुळे ग्रामीण भागात विकास कामे करताना तारेवरची कसरत करावी लागते. तरीसुध्दा काही लोकप्रतिनिधी दुर्गम भागात विकास पोहचविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात. त्यामुळे पाटण तालुका कोयना धरणासारखा सुजलम्-सुफलम् होत आहे. याला पायबंद घालण्यासाठी काही राजकीय पक्षांनी अर्थिक निकष बघून पाटण तालुक्यात आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी पदाची खिरापत वाटली. पण आता ‘कुर्‍हाडीचा दांडा...गोत्यास काळ ठरला आहे’ अशी गत झाली आहे. स्वतंत्रदिनी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण सातारा जिल्ह्यात काही गावांचा अपवाद वगळता शांततेत ग्रामसभा पार पडल्या. परंतु पाटण तालुक्यातील शिंगणवाडी गावच्या ग्रामसभेत गुंडाना घेवून शिक्षण सभापती राजेश पवार यांनी गोंधळ घातल्यामुळे ग्रामस्थ अवाक् झाले. खरे म्हणजे शिक्षण सभापतींकडून मार्गदर्शनाची अपेक्षा ग्रामस्थांनी ठेवली होती. पण सभापतीच्या मग्रुरीमुळे ज्येष्ठ नागरीकांना ग्रामसभा अर्धवट सोडून घरी जावे लागले. तसेच ही ग्रामसभा गोंधळामुळे रद्द करण्यात आली.
या गोंधळानंतर शिंगणवाडीचे सरपंच प्रदिप पवार यांनी कोणत्याही दहशतीला बळी न पडता उंब्रज पोलीस ठाण्यात ग्रामस्थांना बरोबर घेवून तक्रार दाखल केली. पण या तक्रारीमध्ये सातारा जि. प. शिक्षण सभापती राजेश पवार यांचा उल्लेख असल्यामुळे पोलीसांनी गुन्हा दाखल केला पण कायदेशीर कारवाई केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी सनदशीर मार्गाने तत्कालीन सातारा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे चौकशीचे निवेदन दिले. त्यानंतर देशमुख यांनी तातडीने चौकशीचे लेखी आदेश दि. 19 ऑगस्ट रोजी संबधितांना दिले. गेली दोन महिने या आदेशाची प्रत संबधित अधिकार्‍याने ‘मौल्यवान व ऐतिहासिक दस्तऐवज’ समजून स्वत:कडे ठेवली आहे. अधून-मधून या आदेशाचा वापर एटीएम सारखा होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत गांभीर्याने नुतन मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी लक्ष घालून संबधित अधिकार्‍याने जतन केलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजाबाबत प्रामाणीकपणे चौकशी करून प्रशासनातील किड दूर करावी अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान याबाबत शिक्षण सभापती यांच्याशी संबधित कार्यकर्त्यांना कल्पना दिली. मात्र या विषयाबाबत सभापतींनी मौनधारण केल्यामुळे त्यांनी चौकशी पूर्णहोईपर्यंत नैतिक जबाबदारी म्हणून या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सभापतींच्या या कारनाम्यामुळे पाटण तालुक्यात राष्ट्रवादीची पिछेहाट सुरू झाली आहे. याचे शल्य राष्ट्रवादीचे नेते सुध्दा बोलून दाखवत आहेत.

Post a Comment

0 Comments