Hot Posts

6/recent/ticker-posts

खांबावर विजेच्या धक्का लागून कंत्राटी कामगार ठार


वाई
पसरणी, ता. वाई गावच्या हद्दीत भैरवनाथनगर येथे विजेच्या खांबावर विजेचा धक्का लागून वीज कंपनीच्या बाह्यस्त्रोत (कंत्राटी) कामगाराचा मृत्यू झाला. अक्षय रामदास कदम (वय 22), असे मृत युवकाचे नाव आहे. तो वाई तालुक्यातील ओझर्डे येथील रहिवाशी आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून तो वीज कंपनीत नोकरीस असून शुक्रवारी दुपारी 2. 30 च्या सुमारास इलेक्ट्रीक खांबावर ग्राहक तक्रारीचे निवारण करण्यासाठी तो चढला असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाला. त्याचा त्याला जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो खांबावरून खाली पडला.
घटनेनंतर आजूबाजुचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी तातडीने अक्षयला वाई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु, उपचारापूर्वीच त्याचा अक्षयचा मृत्यू झाला होता. वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची चर्चा परिसरात होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सातारा येथील विद्युत निरिक्षकांकडे वाई पोलिसांनी भैरवनाथनगर परिसरात दुपारी 2 ते 4 या सुमारास विद्युत प्रवाह सुरु होता अथवा नाही याबाबतचा अहवाल मागवला आहे. 

Post a Comment

0 Comments