वडूज : वार्ताहर
खटाव पंचायत समिती मासिक सभेत विविध विषयांवर खडाजंगी झाली. सभापती संदीप मांडवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध विषयांबाबत समन्वय साधत नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन अधिकाऱ्यांनी याबाबत तोडगा काढावा असे आवाहन केले.
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या मासिक सभेत अध्यक्ष स्थानी सभापती संदीप मांडवे, उपसभापती कैलास घाडगे, जिल्हा हिवताप अधिकारी अविनाश पाटील, गटविकास अधिकारी प्रवीण सुरोडकर, नायब तहसीलदार सुधाकर धाहिंजे, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे, पशुवैद्यकीय अधिकारी दुर्गादास उंडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
येरळवाडी येथे गेली सहा महिने एसटी बस येत नसल्याने विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत असून विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत पं. स. सदस्य धनंजय चव्हाण यांनी एसटी डेपोचे अधिकारी चौघुले यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी रस्त्यात मोठं मोठे खड्डे असल्याने व रस्त्याचे सुरु असल्याने तात्पुरते ते खड्डे मुजविल्यास एसटी बस सोडण्यात येईल असे आश्वासन चौघुले यांनी दिले.
महावितरण च्या आढावात विजबिले भरली असताना बिले परत कशी येतात. याबाबत प. स. सदस्य नीलादेवी जाधव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर मुळात विजबिले वाढून येतात ती बिले कमी करण्यासाठी येणाऱ्या सर्व सामान्य ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहे. त्यांचा वेळ वाया जात आहे. तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्राधान्य देत याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प. स. सदस्य संतोष साळुंखे यांनी केली.
महसूल प्रशासनाच्या आढाव्यात तालुक्यातील वारसांच्या नोंदी रखडल्या असल्याबाबत पंचायत समितीच्या सदस्यांनी नायब तहसीलदार धाहिंजे यांना जाब विचारले असता वारस नोंदी, साध्या नोंदी मुदतीत होत असून न्यायालयीन प्रवीष्ठ नोंदी होण्यास वेळ लागत आहे. तर प. स. सदस्य मेघा पुकळे यांनी वृद्धापकाळ योजनेसाठी लागणार २१ हजाराच्या उत्पन्ना दाखल्याबाबत लोकांची अडवणूक होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी धाहिंजे म्हणाले, मंडलाधिकारी यांच्याकडे स्थानिक चौकशी करण्याकरिता ज्यांना खरच गरज आहे अशा गरजू लाभार्थींची स्थानिक चौकशी करून या योजनेसाठी दाखला दिला जातो. तसेच सध्या खटाव तालुक्यात सात-बारा ऑनलाइनचे काम चालू आहे. ऑनलाइन चुका काढण्याचे काम सध्या चालू असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले ऑनलाइन सात-बारा बरोबर आहेत का? याची खात्री करावी. नाहीतर सात-बारा मध्ये काही चुका झाल्यास कायदेशीर प्रक्रिया राबवावे लागेल त्यासाठी ऑनलाइन सात-बारा सर्व शेतकऱ्यांनी तपासून घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी पशुवैद्यकीय, बांधकाम, पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे, वैद्यकीय, वन, उरमोडी सिंचन प्रकल्प, सामाजिक वनीकरण, ग्रामीण रुग्णालय, जि. प. बांधकाम उपविभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, अंगणवाडी आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी प. स. सदस्य रेखा घार्गे, जयश्री कदम, वनिता हिरवे, हिराचंद पवार, आनंदराव भोंडवे, कृषी विभागाचे गोसावी, लघु पाटबंधारे येवले, तालुका वैद्यकीय अधिकारी इनुस शेख, पाणी पुरवठा अधिकारी झेंडे, बांधकाम विभागाचे माने आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0 Comments