वडूज/प्रतिनिधी : अनेक गुन्ह्यांत जेलची हवा भोगून वडूजमध्ये परत आलेल्या नामचिन गुंड बजरंग गदाप्पा पुजारी उर्फ बज्या याने शुक्रवार दि. 9 रोजी सकाळ सकाळीच रस्त्यावरील वाहनांची आडवाआडवी करण्याबरोबरच एका माध्यमिक शिक्षकास मारहाण केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन काही पोलीसांना शिवीगाळ, दमदाटी व किरकोळ मारहाण करण्याबरोबर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
वडूज पोलीस ठाण्याचे तत्कालीन हवालदार कै. पळसे यांच्यावरील खुनी हल्ला, पारधी महिलेवरील हल्ला या व इतर प्रकरणांत गेली काही वर्षे बज्या पुजारी तुरूंगात होता. गेल्या काही दिवसांपूर्वी सबळ पुराव्याअभावी त्याची न्यायालयाने सुटका केली होती. तुरूंगातून सुटल्यानंतर गेल्या दोन दिवसांत त्याने पुन्हा आपले कारनामे सुरू केले आहेत. शुक्रवारी सकाळी शेतकरी चौकात त्याने रस्त्यावरून येणार्या जाणार्या वाहनांना आडकाठी केली. त्याचबरोबर या मार्गावरून घराकडून शाळेकडे गाडीतून निघालेल्या हुतात्मा परशुराम विद्यालयातील उपशिक्षक महेश शामराव गोडसे यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. त्यानंतर तडक तो पोलीस ठाण्यात आला. याठिकाणी कार्यरत असणार्या काही पोलीसांना दमदाटी करण्याबरोबरच एका पोलीसास मारहाण केल्याची चर्चा आहे.
त्यानंतर तो पोलिस ठाण्यासमोर असलेल्या एका झाडावर चढला व त्यानेे दोरीच्या साह्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर तेथे असलेल्या काही पोलिस आणि नागरिकांनी झाडावर चढून तत्काळ बजरंगच्या गळ्याभोवतीचा फास काढला.त्यानंतर रुग्णवाहिकेने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालया त दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

0 Comments