कोरेगाव
तालुक्यातील किन्हई येथे सोमवारी सायंकाळी अंधाराचा फायदा घेऊन कोयत्याचा धाक दाखवून चंद्रकांत मारुती भिसे यांची 1700 रुपयांची लूट केल्याप्रकरणी जांब खुर्द येथील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, की किन्हई ते रामनगर रस्त्याने भिसे हे चौकातून पायी चालत चालले होते. सायंकाळी 6.30 च्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन जांब खुर्द येथील चंदर विठ्ठलराव जाधव, बबन विलास जाधव व राजेंद्र सर्जेराव जाधव यांनी भिसे यांना कोयत्याचा धाक दाखविला आणि त्यांच्याकडील 1700 रुपयांची रोकड चोरुन नेत पोबारा केला.
भिसे यांनी याबाबतची माहिती सुरुवातीला सातारारोड पोलीस दूरक्षेत्र आणि त्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तातडीने हालचाल करत स्थानिक माहितीच्या आधारे बबन विलास जाधव व राजेंद्र सर्जेराव जाधव यांना अटक केली. त्यांनी या लुटीत चंदर विठ्ठलराव जाधव हा सूत्रधार असून, त्याच्याकडे रक्कम असल्याचे सांगितले. दोघांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महेश शिलार यांनी त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सातारारोड पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार सत्यवान बसवंत अधिक तपास करत आहेत.

0 Comments