सातारा : थकीत वीजबिलांचा भरणा न करणार्या सातारा जिल्हयातील जवळपास दोन हजार ग्राहकांसह बारामती परिमंडलातील १० हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची धडक मोहीम तीव्र झाली असून गेल्या ४ दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीसुद्धा ही मोहीम सुरू राहणार आहे.
वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यास महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने मंगळवारपासून धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार बारामती परिमंडलातील बारामती, सातारा व सोलापूर या तिन्ही मंडलात थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र झाली आहे. यात वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिल न भरणार्या १० हजार ४६९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या ४ दिवसांत खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे ३ कोटी ९४ लाख रुपये थकीत आहेत.
लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध सुरु असलेल्या धडक कारवाईत (कंसात थकबाकी) बारामती मंडल - २,७०० (१ कोटी ५८ लाख), सातारा मंडल - १,९६३ (५० लाख), तर सोलापूर मंडलात ५,८०६ ग्राहकांचा (१ कोटी ८६ लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची थकबाकीदारांनी कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरीत भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली धडक मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. वीजबिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. थकीत वीजबिलांचा भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्रांसह व घरबसल्या ऑनलाईन पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
वीजबिल भरणा केंद्रे आज सुरू राहणार
थकबाकी व चालू वीजबिलांचा ग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे दि.१२ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. रविवारी (दि. १२) सार्वजनिक सुटी असली तरी जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

0 Comments