कु.प्रगती धनंजय पार्टे
जीवनात प्रत्येक माणसाला काही ना काही आकांक्षा असतात, स्वप्ने असतात.पूर्ण होणारी किंवा अपूर्ण राहणारी!यामुळेच माणूस हरवायला शिकतो, त्यातूनच पुन्हा स्वतःला शोधायलाही शिकतो.हे हरवणं -गवसणं सुद्धा फार गमतीदार असतं म्हणून आयुष्यात आपल्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास असणं गरजेचं असतं.ध्यासामुळेच आपल्याला एक मिशन मिळतं.काहीतरी करण्याची जिद्द प्राप्त होते.आपल्या स्वप्नांबद्दल आपण वचनबद्ध होतो.
कुणीतरी अगदी सुंदर म्हटलंय, "अगणित आकांक्षांनी ज्यांच्या मनात घर केलंय त्यांचा ध्यास त्यांच्या चितेसोबत जळत नाही."
माणसाला एखाद्या गोष्टीचा लागलेला ध्यास हा त्याला परिवर्तनाच्या शिखराकडे वाटचाल करण्यासाठी सतत रिझवत असतो, प्रेरित करत असतो.याच परिवर्तनाच्या शिखराकडे वाटचाल करण्यापूर्वीची महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे "आत्मजाणीव".
थोर ग्रीक विचारवंत "सॉक्रेटिस" याचं एक वाक्य मला अंतर्मुख करतं-"Know Thyself" म्हणजेच "स्वतःला ओळखा."
आपल्याकडे असलेल्या क्षमतांचा आणि सामर्थ्याच्या जाणिवेचा आनंद हा खरे तर शाश्वत आनंद असतो.ज्या माणसाला आत्मतत्त्व गवसते तो एका नव्या तेजाने उजळून जातो.
कवी ग.दि.माडगूळकर यांची एक कविता याच गोष्टीचे समर्थन करते.गदिमांच्या "एका तळ्यात होती" या कवितेतल्या बदकांमध्ये असाच एक राजहंस होता.बदकांनी त्याला टोचून टोचून वाळीत टाकले.कुरूप-कुरूप म्हणून हिणवले.त्याला धाक दाखवला परंतू एके दिवशी त्याला सारे काही समजले आणि त्याचे भय वाऱ्यासवे उडून गेले.त्याने स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात पाहिले.ते जाणीवपूर्वक न्याहाळले.तेव्हा त्याला समजले की, अरेच्चा!आपण तर राजहंस आहोत.आपली विहारण्याची जागा या छोट्याशा डबक्यात नाही तर हिमालयाच्या मानस सरोवरात आहे.
प्रत्येक व्यक्तीमध्ये असंच काहीतरी वेगळेपण आहे.अद्वितीय गुणवत्ता आहे.या गुणवत्तेला तारूण्यातंच योग्य परिश्रमांची जोड द्यायला हवी नाहीतर आयुष्याच्या संध्याकाळी आपला पश्चाताप ऐकायला कोणालाच वेळ नसेल.
ज्या व्यक्तीच्या मनात स्वतःवरच्या विश्वासाचा दिप तेवत नसतो त्या व्यक्तीसाठी आकाशात हजारो सूर्य झळकले तरी अंधार असतो.आणि यशाचा मार्ग हा अंधारात चाचपडत बसणार्यांसाठी नाही, तर तो आत्मविश्वासाचे तेज लेवून प्रयत्नपूर्वक मार्गक्रमण करणाऱ्यांसाठी आहे!
म्हणून आजच स्वतःच्या अंतर्मनात डोकवा.स्वतःच्या सामर्थ्याचा शोध घ्या.कारण स्वतःमध्ये काहीतरी प्रतिभा असणे हे जर वरदान असेल तर ती प्रतिभा ओळखता न येणे यासारखा दुसरा शाप नाही!!!!!

0 Comments