विक्रम चोरमले(फलटण):
वाठार निंबाळकर ता. फलटण येथील शिवानी संतोष कदम (वय ११) महिने व शिवाजी संतोष कदम (वय ४ वर्ष) या दोन्ही मुलांचा मृत्यू उपचार सुरू असताना दिनांक २१ रोजी झाला होता. दोन्ही मुलावर फलटण येथील बालरोग डॉक्टरकडे उपचार सुरू होते. शिवानी संतोष कदम (वय ११) या मुलीचा मृत्यू सकाळी झाला व शिवाजी संतोष कदम (वय ४ वर्ष) यांचा दिनांक २१ रोजी सायंकाळी मृत्यू झाला होता. एकाच दिवशी दोन्ही मुलाच्या मृत्यूमुळे नातेवाईकाना मोठा धक्का बसला. या मृत्यूबाबत अनेक तर्क लावले जात असले तरी या दोघांचा मृत्यू कीटक नाशकामुळे झाला असल्याची माहिती समोर येत असून राखून ठेवलेल्या व्हिसेरा मधून लवकरच ही बाब समोर येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे .
संतोष वामन कदम (वय ४०) व पूजा संतोष कदम (वय ३५) हे पती-पत्नी व दोन्ही मुले गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला, ताप यांने त्रस्त होते. सर्वांवर स्थानिक डॉक्टरकडे उपचार सुरू होते.परंतु काल दोन्ही मुलाचे निधन झाले यानंतर काल सायंकाळी कदम पती-पत्नी यांना फलटण येथील खराडे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्यामुळे कदम पती-पत्नी यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. पुणे येथे पती-पत्नी यांच्या आजाराच्या निदानासाठी करण्यात आलेल्या डेंग्यू टेस्ट या निगेटिव्ह आल्या ईतर टेस्टही निगेटिव्ह आल्या. त्यामुळे डेंग्यूमुळे हे कुटुंब त्रस्त होते या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पुणे येथील रिपोर्ट मध्ये पती-पत्नीला वायरल इन्फेक्शन असल्याचे निदान करण्यात आले.स्वाईन फ्लू व चिकन गुनिय या आजाराची लक्षणे या दोन्ही पती-पत्नी मध्ये दिसत नव्हती असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. सकाळी पुणे येथुन फलटण येथील सरकारी रुग्णालयात आज उपचारासाठी दाखल करण्यात आले असता कदम पती-पत्नी यांच्या रक्तपेशी कमी झाल्या असल्याची बाब डॉक्टराच्या लक्षात आली व संतोष वामन कदम यांच्या युरिन टेस्ट व लिव्हर मध्ये दोष आढळला. नक्की कोणत्या आजारामुळे दोन लहान मुले दगावली व कदम पती-पत्नी यांची प्रकृती खलावली यांचे निदान होत नव्हते.
सत्य सह्याद्रीने याबाबत खोलवर माहिती घ्यायचे ठरविले शेवटी काही बाबी समोर यायला लागल्या की पहिली बाब समोर आली की, शिवाजी संतोष कदम या चार वर्षांच्या मुलांच्या शवविच्छेदन अहवालात एक गोष्ट समोर आली की या लहान मुलाच्या फुफुसास सूज होती, दुसरी बाब समोर आली की दोन्ही मुलाचे निधन कोणत्याही आजाराची लक्षणे नसतात अचानकपणे उलटी होऊन झाले होते, तिसरी बाब समोर आली की संतोष वामन कदम यांच्या युरिन टेस्ट व लिव्हर मध्ये दोष आढळला. यानंतर सविस्तर माहिती घेतली असता असे समजले की संतोष वामन कदम यांनी मागील आठवड्यात मका पिकास किड लागू नये म्हणून एका कीटकनाशकाचा वापर केला होता व त्यानंतर ही मका असणारी पोती घरात ठेवली होती.
ग्रामपंचायत कर्मचारी व काही नातेवाईक यांनी कदम कुटुंब राहत असलेल्या घराची काल तपासणी केली असता त्यांना काही कीटकनाशकाची पाकीट सापडली होती. आम्ही या कीटकनाशकाच्या वापरामुळे अथवा कीटकनाशकाच्या संपर्कात आल्यामुळे अचानकपणे मृत्यू होऊ शकतो का? जी लक्षणे कदम कुटुंबातील सदस्यामध्ये आढळली ती लक्षणे कीटकनाशकाची दुष्परिणामामुळे दिसू शकतात का याबाबत तज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली असता तसेच या घटनेत वरील तीन बाबीची माहिती दिली असता कीटकनाशकाच्या वापरामुळे तसेच ज्या घरात ही पोती ठेवली होती त्यांच्या संपर्कात आल्यास कीटकनाशके जीवितहानीस कारणीभूत ठरू शकतात व वरील लक्षणेही दिसू शकतात ही बाब डॉक्टरांनी दैनिक सत्य सह्याद्रीस बोलून दाखवली. यानंतर सायंकाळी डॉक्टर जे.टी.पोळ यांनी या दोन्ही रुग्णाची सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता कीटकनाशकाच्या संपर्कात आल्यामुळे कदम कुटुंबातील सर्व सदस्यांची ही परिस्थिती निर्माण झाली असेल ही शंका नातेवाईक यांच्या निदर्शनास आणून दिली.कीटकनाशकाची दुष्परिणामाचे निदान करण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नसल्याने कदम पती-पत्नी यांना पुढील उपचारासाठी पुन्हा ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार रात्री पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले.
दैनिक सत्य सह्याद्रीने याबाबत कृषि विभाग, महसुल विभाग व पंचायत समिती, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांना याबाबत कल्पना दिली असता सर्व खात्याचे अधिकारी व कर्मचारी गुरुवारी सकाळी वाठार निंबाळकर येथील घटनास्थळी
भेट देणार असून कीटकनाशकामुळे ही घटना घडली आहे का याविषयी माहिती घेणार आहेत. त्यानंतर या घटनेची पुढील दिशा ठरणार आहे. आजही दोन लहान मुलांचा मृत्यू होवूनही मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला तसेच कदम पती-पत्नी यांची प्रकृती कोणत्या आजारामुळे खालावली आहे हे अद्याप ठोसपणे समजले नाही.


0 Comments