Hot Posts

6/recent/ticker-posts

कराड-विजयनगर रस्त्याच्या खुदाईवरून काँग्रेस आक्रमक, रास्ता रोको आंदोलन


कराड
गुहागर-पंढरपूर महामार्गावर कराड ते विजयनगर दरम्यान करण्यात आलेल्या रस्त्याच्या खुदाई प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महामार्गावर सुमारे तासभर महामार्ग रोखून धरला होता. 

आनंदराव पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपलब्ध केलेल्या निधीतून विविध रस्त्यांचे रुंदीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले असून त्यापैकी एक कर्‍हाड चिपळून मार्गावरील कर्‍हाड ते विजयनगर रस्त्यासाठी 21 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार सदर रस्त्याचे काम पूर्णही झालेले आहे. हा रस्ता आतापर्यंत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता मात्र भाजप सरकारने हा रस्ता तातडीने  केंद्र शासनाकडे हस्तांतरीत केला आहे. कराड ते हेळवाक ता. पाटण हा य ा रस्त्याचा पहिला टप्पा असून रस्त्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे.

सबंधित कंपनीने या रस्त्याच्या कामाला हेळवाककडून सुरुवात करण्याची मागणी स्थानिक, सरपंच आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. परंतु कंपनीच्या अधिकार्‍यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता काम कर्‍हाडच्या बाजूने सुरू करण्यात आले आहे.
सध्या कंपनीकडून विजयनगर ते कराड पर्यंतचा रस्ता पूर्णपणे उकरण्यात आल्याने रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु असून वाहनांची कोंडी होत असून रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. या रस्त्यावर आतापर्यंत सहा ते सात अपघात झाले असून यासाठी सबंधित कंपनीला जबाबदार धरीत कंपनी व कंपनीच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच जोपर्यंत काम चांगल्या प्रकारे केले जात नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थिती या रस्त्याचे काम सुरू होऊ देणार, नाही असा इशाराही त्यांनी दिला.
नामदेव पाटील म्हणाले, कराड ते विजयनगर या रस्त्यासाठी  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 21 कोटी रूपये दिले. त्यातून हा रस्ता करण्यात आला. मात्र, सध्याच्या भाजप सरकारने राज्य सरकारकडे असणारा हा रस्ता केंद्रसरकारकडे हस्तांतरीत केला आहे. या सरकारने रस्त्याच्या कामाचे टेंडर खासगी कंपनीकडे दिले असून कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाचे पैसे पाण्यात गेले आहे. कर्‍हाड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अजित पाटील चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हा काँग्रेसच्यावतीने कर्‍हाड शहर पोलिस प्रमुख प्रमोद जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात हजारो कार्यकर्त्यांनी सहभागी होत प्रतिसाद दिला. सुमारे एक तास गुहागर-पंढरपूर महामार्ग रोखण्यात आला. पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य मंगल गलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, उत्तमराव पाटील, पंचायत समिती सदस्या वैशाली वाघमारे, बाजार समिती संचालक सुनील पाटील, अजित पाटील चिखलीकर, विजय चव्हाण, नंदना करमरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments