Hot Posts

6/recent/ticker-posts

‘सह्याद्रि’च्या तीन लाख ऐंशी हजारांवरील पहिल्या पाच साखर पोत्यांचे पुजन


साखर पोती पुजन प्रसंगी चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील, व्हा.चेअरमन सौ. लक्ष्मी गायकवाड, कार्यकारी संचालक आर सी बडगुजर व सर्व संचालक, सभासद, अधिकारी.
यशवंतनगर/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2017-18 या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या 3 लाख 80 हजारांवरील पहिल्या पाच साखर पोत्यांचे पुजन कारखान्याचे चेअरमन मा.आमदार बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन मा. सौ.लक्ष्मी गायकवाड व सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

या कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, राज्यात जून जुलैमध्ये तुरळक आणि सप्टेबर ऑक्टोबरमध्ये परतीच्या मान्सुनमुळे चांगला पाऊस झाला. ज्या भागातून ऊस तोडणी मजूर येतात, त्यांच्या कोरडवाहू जमीनीमध्ये पेरणीची कामे सुरू असल्याने यंत्रणा दरवर्षीपेक्षा 20 टक्के कमी आली. यंत्रणा कमी असण्याची ही परिस्थिती राज्यातील सर्वच कारखान्यांची आहे, त्यावर कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेस पुरेल अशा प्रकारे ऊसाची आवक व्हावी, यासाठी काटेकोर नियोजन केलेले असून, प्रतिदिन 8200 मे.टनाचेवर म्हणजेच दैनंदिन गाळप क्षमतेच्यावर कारखान्याचे ऊस गाळप सुरू आहे. या हंगामामध्ये कारखान्याने 41 दिवसाअखेर 3,23,500  मे. टन एवढया ऊसाचे गाळप केले असून, सरासरी साखर उतारा 11.31 टक्के मिळाला आहे. व 3 लाख 75 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आलेले आहे. सह्याद्रिचे ऊस गाळप व साखर उत्पादन जिह्यात नंबर एकवर आहे.

 कारखाना स्थापनेपासूनच कारखान्याच्या कामकाजातील पारदर्शकता आणि सुप्रशासन यावर कारखान्याच्या सभासदांचा विश्‍वास आहे आणि त्याबाबतीत सह्याद्रिचा राज्यात नावलौकिक आहे. तो असाच टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकरी सभासदांना न्याय देण्यासाठी सह्याद्रि कारखाना नेहमीच पुढे असतो. 
कारखान्याने, चालु गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाच्या पहिल्या उचलीपोटी प्रती टनास 3021/- रूपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहेत.

गतवर्षी कमी पाऊसमानामुळे आवर्षण प्रवण परिस्थिती निर्माण झाली. राज्यात सर्वत्रच ऊसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे चालू सन 2017-18 गळीत हंगामासाठी ऊसाची उपलब्धता कमी असून, राज्यात अनेक कारखान्यांना ऊसाची टंचाई आहे. शेतकरी सभासदांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस सह्याद्रि कारखान्याकडेच गळीतासाठी पाठवावा, असे आवाहन चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे सर्व संचालक, ऊस उत्पादक सभासद, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी मजूर व वाहतूक कंत्राटदार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments