फलटण/सत्य सह्याद्री वृत्तसेवा
फलटण येथील तहसील कार्यालया लगत असणाऱ्या नवीन शासकीय धान्य गोदामात सुरु करण्यात आलेल्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रात आपला शेतमाल विक्रीसाठी आणून शेतकऱ्यांनी शेतमालास रास्तभाव मिळवावेत असे आवाहन फलटण तालुक्यातील शेतकर्यांना फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती आणि फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन
यांचे संयुक्त सहभागाने फलटण येथील नवीन शासकीय धान्य गोदामात सुरु करण्यात आलेल्या मका शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ काटापूजन व श्रीफळ वाढवून श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, संचालक मोहनराव निंबाळकर, विनायकराव पाटील, प्रकाश भोंगळे, नायब तहसीलदार अंकुश ईवरे, पुरवठा अधिकारी शिवाजी जगताप, मनोज काकडे, मालोजी कदम, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, फलटण तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या या केंद्रात शेतमालाचे दर पडल्यानंतर शेतकर्यांऐवजी मध्यस्थांचा होणारा फायदा टाळून शेतकर्यांना रास्तदर मिळवून देण्यासाठी शासनाची हमीभाव योजना उपयुक्त असल्याचे नमूद करीत शेतकर्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
शेतकर्यांनी या खरेदी केंद्रावर आपली मका विक्रीस आणण्यापूर्वी मका पीकाची नोंद असलेला अद्ययावत असणारा चालू ७/१२, बँक पासबुक झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स, मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. तसेच नाफेड या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर मका खरेदी केंद्राकडून एस.एम.एसद्वारे किंवा फोनद्वारे कळविल्यानंतरच शेतकर्यांनी आपली मका विक्रीसाठी केंद्रात आणावयाची असून १४ टक्केपर्यंत आर्द्रता असलेली मका खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकर्यांनी आपली मका वाळवुन स्वच्छ करुन विक्रीसाठी आणावी असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकर सोनवलकर यांनी केले आहे.

0 Comments