Hot Posts

6/recent/ticker-posts

बुडालेल्या क्रुझर मधील युवक अद्याप बेपत्ता, अशास्त्रीय वळणाने बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर


फलटण/विक्रम चोरमले 
भिलार महाबळेश्वरहून फलटण मार्गे नांदेडकडे निघालेली भरधाव वेगातील क्रुझर गाडी चालकास वळणाचा अंदाज न आल्याने थेट पुर्ण क्षमतेने वाहत असलेल्या नीरा उजवा कालव्यात गेली. सदर गाडीतील सात व्यक्तींपैकी सहाजण पोहून बाहेर आले असले तरी एक तरुण वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान फलटण - पंढरपूर रोडवरील कोळकी हद्दीतील रावरामोशी पुल, तेथील अशास्त्रीय वळण व बांधकाम विभागाचा कारभार या घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील माहुर तालुक्यातील वझरा ( सेफ ) येथील रामेश्वर पवार, शत्रुघ्न चांदेकर व प्रफुल्ल राठोड हे तरुण पुणे येथे टिटोरीयल आर्मीच्या भरतीसाठी आले होते. पुणे येथील भरती नंतर सातारा व बेळगाव येथे होणा-या  भरतीसाठी जाण्याचे त्यांचे नियोजण होते परंतु पैशाच्या कारणास्तव ते त्यांच्या भागातील काहीजण कामानिमित्त महाबळेश्वर येथे असल्याने त्यांचेकडे गेले होते. महाबळेश्वर येथे तीन चार दिवस राहुन काम करुन या तरुणांसह  काहीजणांनी आपल्या गावी जाण्याचे ठरविले. त्यानुसार ते एम एच २६ ए एफ २८५२ या क्रुझर गाडीतून भिलार महाबळेश्वरहून रात्री दहाच्या सुमारास नांदेडकडे रवाना झाले. 

फलटण - पंढरपूर रस्त्यावर फलटण शहरापासून केवळ दोन किलोमिटर अंतरावर धुळदेव हद्दीत असलेल्या रावरामोशी पुलावर असलेल्या धोकादायक वळणाचा अंदाज चालकास न आल्याने गाडी थेट पुर्ण क्षमतेने वाहत असलेल्या नीरा उजवा कालव्यात गेली व बुडाली. यावेळी गाडीतुन  १) सिद्धार्थ देवराव आरके- वय २२ वर्ष राहणार- दत्तमांजरी ता. माहूर २) प्रफुल्ल दारासिंग राठोड-वय २३ वर्ष राहणार- वझरा ता.माहूर ३) शत्रुघ्न रामराव चांदेकर-वय २३ वर्ष राहणार- वझरा ता.माहूर ४) मारुती संभाजी शेंबटेवाड-वय २५ वर्ष राहणार-खराटवादी ता. हादगाव ५) कचरू दत्त गिरेवाड-वय २३ वर्ष राहणार-चितगिरी ता.भोकर ६) बालाजी अनिल राठोड- वय २३ राहणार- दत्तमांजरी ता. माहूर ७) रामेश्वर शिवदास पवार राहणार- दत्तमांजरी ता. माहूर हे प्रवास करीत होते. नीरा उजवा कालवा खोल व रुंद असल्याने तसेच तो पुर्ण क्षमतेने वाहत असल्याने अपघातानंतर गाडी कालव्याच्या प्रवाहात पुर्णपणे पाण्यामध्ये बुडाली. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे गाडीचे दरवाजे उघडणे अशक्य झाले होते. यावेळी गाडीची पुढील व मागील काचा फोडून आपला जीव वाचवून काठावर येण्यात सिद्धार्थ देवराव आरके, प्रफुल्ल दारासिंग राठोड, शत्रुघ्न रामराव चांदेकर, मारुती संभाजी शेंबटेवाड, बालाजी अनिल राठोड, रामेश्वर शिवदास पवार यांना यश आले. परंतु त्यांचा सहकारी कचरू दत्ता गिरेवाड  वय २४ वर्ष राहणार-चितगिरी ता.भोकर जिल्हा.नांदेड हा दिसुन आला नाही त्यामुळे तो गाडीत अडकला असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती.

रात्री या अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे व फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत व ईतर पोलीस कर्मचारी यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेवून वेळेत मदत उपल्बध करुन दिल्याने अपघातग्रस्तांना दिलासा मिळाला. दिवस उगवत असतानाच क्रेनला पाचारण करण्यात आले. परंतू पाण्याचा वेगवान प्रवाहामुळे अपघात स्थळी गाडी सापडत नव्हती. अखेर अपघात स्थळापासून पुढील अंतरावर गाडी मिळून येताच ती क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. परंतू  या गाडीत कचरू दत्ता गिरेवाड  वय २४ वर्ष राहणार-चितगिरी ता.भोकर जिल्हा.नांदेड हा दिसून आला नाही त्यामुळे तो वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. जीव वाचविण्यात यशस्वी ठरलेल्या तरुणांना हाता पायांना व डोक्यास किरकोळ दुखापत झाली आहे.

Post a Comment

0 Comments