Hot Posts

6/recent/ticker-posts

जागरुक ग्राहक खऱ्या अर्थाने राजा असेल - रविंद्र बेडकीहाळ



फलटण/सत्य सह्याद्री वृत्तसेवा
ग्राहक आजहि आपल्या अधिकारांबाबत जागरुक नाहित. ग्राहकांचे शोषण होऊ नये म्हणुन ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आणला गेला. परंतु जेव्हा ग्राहक आपल्या हक्कांबाबत व होणार्या फसवणूकी बाबत जागरुक होतील व जाब विचारतील, त्यावेळी ग्राहक खर्या अर्थाने राजा असेल असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व राज्यस्तरीय दक्षता समितीचे सदस्य रविंद्र बेडकीहाळ यांनी केले.

फलटण  येथील तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार विजय पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा फलटणचे सचिव पत्रकार किरण बोळे, रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सिराज शेख, पत्रकार स. रा. मोहिते, विकास अहिवळे आदी माण्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सेवा देणारा व सेवा घेणारा हे दोघेही ग्राहकाच्या भुमिकेत येत असतात. ग्राहकांची आर्थिक लुट होऊ नये याकरिता ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व प्रबोधन शासकीय यंत्रनेद्वारे प्रभावीपणे होणे अपेक्षित आहे अशी अपेक्षा व्यक्त करुन बेडकीहाळ म्हणाले,  ग्राहकांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहक संरक्षण कायदा केला असला तरी अनेकांना त्याच्या विषयी पुर्णपणे माहिती नाही. जेव्हा ग्राहक या कायद्याचा अभ्यास करतील व आपल्या हक्काबाबत जागृत होतील तेव्हा खर्या अर्थाने शोषणमुक्त समाजाची निर्मिती होइल.

बाजार पेठेत ग्राहक हा महत्वाचा घटक आहे. ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकास विविध हक्क मिळालेले आहेत. जर ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे आली तर संमंधिताविरोधात कारवाईची पावले उचलली जातील अशी ग्वाही यावेळी तहसिलदार विजय पाटील यांनी बोलताना दिली.

कार्यक्रमात प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन माण्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी वर्षभर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सत्यनारायण मारवाडी, फलटण व यशवंत गुंजवटे, झिरपवाडी या रास्तभाव दुकानदारांचा सत्कार तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत पुरवठा अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले. आभार मनोज काकडे यांनी मानले. कार्यक्रमास व्यापारी असोसिएशनचे शशिकांत दोशी, चेतण घडिया रास्त भाव दुकानदार संघटनेचे श्रीपाद विभुते, संजय जाधव, दादा भोंगळे, अभिजित निंबाळकर, प्रविण निंबाळकर आदींसह विविध क्षेत्रातील माण्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments