सातारा/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
चालू पवनचक्की बंद पाडून त्यावरील तांब्याची तार चोरणार्या तसेच त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करून, अटक करून तसेच सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा, पाटण, कारड तालुका हद्दीतून पाचजणांच्या टोळीला 6 महिन्यांसाठी तडीपार केले आहे.
यामध्ये कोंडीबा लक्ष्मण शिर्के (वय 36, रा. चिखली, ता. सातारा), रवींद्र शंकर यादव (वय 25, टोळी सदस्य) रा. मराठवाडी, ता. पाटण, रमेश किसन मोरे (वय 24), रा. आवार्डे (कुशी), ता. पाटण, संदेश उर्फ चिंग्या तात्याबा सपकाळ (वय 27) रा. सावरघर, ता. पाटण, जि. सातारा या पाचजणांचा या टोळीमध्ये समावेश आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही टोळी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्या पवन उर्चा प्रकल्पातील पवनचक्की बंद पाडून त्यावरील उच्चप्रतिची तांब्याची तार चोरी करत होते. त्याबाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
वेळोवेळी गुन्हे दाखल करून, अटक करून तसेच सुधारण्याची संधी देऊनही वरील पाचजणांच्या टोळीतील सदस्यांमध्ये कोणतीही सुधारणा होत नव्हती. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत होती. त्यांच्याकडून तालुक्यात हिंसक घटना घडून दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये तसेच जिल्ह्यातील पवनउर्जा प्रकल्पांचे संरक्षण व्हावे म्हणून या टोळीतील पाचजणांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव सातारा तालुका पोलिसांनी सादर केला होता. त्यानुसार या पाचजणांना सातारा, पाटण, कारड तालुका हद्दीतून पाचजणांच्या टोळीला 6 महिन्यांसाठी तडीपार केले आहे. आदेशाची बजावणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत त्यांना सातारा, पाटण व कराड हद्दीतून बाहेर जावे, असेही आदेशात म्हटले आहे.

0 Comments