सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शेतात भांगलायला जाणार्या बायकांना 250 रुपये दररोज मिळतात (सभागृहात झालेला उल्लेख) परंतु जनतेची सेवा करणार्या आमच्यासारख्या लोकसेवकांना केवळ 130 रुपये दररोजचे मानधन मिळते. त्यामुळे झेडपी सदस्यांना किमान 15 हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे, अशी मागणी मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत झाली. या मागणीवर सदस्यांनी बाके वाजवून अनुमोदन दिले परंतु, सदस्य दीपक पवारांनी मात्र याला हरकत घेतली.
शेंद्रे गटाचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी सभेत मानधनाचा मुद्दा उपस्थित केला. आमदार, खासदारांना घसघशीत पगारवाढ मिळते मग झेडपी सदस्यांना तुटपुंजे मानधन का? या 3 हजार मानधनात चहापाण्याचा खर्चही भागत नाही, अशी खंत व्यक्त करत सदस्यांना किमान 15 हजार मानधन मिळावे असा ठराव घ्या, अशी मागणी डॉ. चव्हाण यांनी केली. चव्हाणांच्या मागणीचे सर्व सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. डॉ. चव्हाणांच्या मुद्द्याला भीमराव पाटील यांनीही समर्थन दिले.
मात्र, दीपक पवार यांनी याला हरकत घेत सर्व सदस्यांना स्व. यशवंतराव चव्हाणांची आठवण करून दिली. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण म्हणायचे, मानधनाची अपेक्षा करू नका, लोकांची कामे करा आणि सातारा जिल्हा परिषद त्यांच्या विचारावर चालणारी आहे, त्यामुळे मानधनवाढ कशाला हवी? असा मुद्दा त्यांनी मांडला. तरीही बहुमतामुळे मानधनवाढीचा प्रस्ताव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. शिवाय जिल्हा परिषदेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा म्हणजे मानधन वाढेल, असे सुचवले.
अध्यक्ष संजीवराजेंनी मानधनवाढीचा सकारात्मक विचार करू, असे सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी सर्व सदस्यांना खासदार, आमदारांचा पगार आणि त्याचे स्त्रोत वेगळे आहेत. जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्याशी आपली तुलना करून घेऊ नये, सांगितले.
दरम्यान, माणच्या सभापतींनी मध्येच उठून सभापतींचेही मानधनवाढीचे बघा, असे म्हणताच अनेकांनी तुम्हाला 10 हजार मानधन आहे, तुम्हाला कशाला वाढ हवी, असे म्हणत त्यांना रोखले. परंतु, त्यात काय होतंय हा त्यांचा भाबडा प्रश्न त्यांनी तसाच पुढे रेटला.
0 Comments