अभिनव पवार @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क सातारा
सध्या नॅशनल हायवेवरील सहपदारीकरणाचे काम मार्च अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रिलायन्स कंपनीपुढे आहे. याच कामांचा लेखाजोखा आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या उपस्थितीत मांडण्यात आला. या कामांबाबत शिरवळ ते खिंडवाडी या दरम्यान अनेक समस्या तेथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या.
शिरवळ येथील सेवा रस्ते करण्यात यावेत
शिरवळ हे एक नवीन शहर बनू पाहत आहे. येथील सेवा रस्ते, इलेक्ट्रिक लाईन शिफ्टिंग तसेच नवीन उड्डाणपूल व इतर अनेक समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी शिरवळ ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रदीप माने यांनी जिल्हाधिकारी यांना केली.भुईंज येथील रेंगाळलेली कामे तातडीने मार्गी लावावीत
भुईंज ग्रामस्थांनी श्री.गजानन भोसले यांच्या नेतृत्वाखाली भुईंज येथील हायवेच्या निकृष्ट दर्जाचे कामाबद्दल तसेच पावसाळ्यात होणाऱ्या त्रासाबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासमोर म्हणणे मांडले. स्मशानभूमीत जाण्यासाठीचा रस्ता पावसाळ्यातील हायवेच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. सेवा रस्त्यांना जोडणाऱ्या गावातील रस्त्यावर चढ असल्यामुळे साधी बैलगाडीही जाऊ शकत नाही हे निदर्शनास आणून येथील कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे सांगण्यात आले.वेळे येथे हायवेवर नवीन उड्डाणपूल तयार करावा
वेळे या ठिकाणी अनेक अपघात घडत असतात. चौपदरीकरणाच्या वेळी करण्यात आलेला अंडरपास शेवटची घटका मोजतोय. इथे खरंतर उड्डाणपूल आवश्यक आहे. ग्रामस्थांनी या उड्डाणपुलाची मागणी अनेकदा करूनसुद्धा तो आत्तापर्यंत झाला नाही. तेव्हा या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात यावा या ग्रामस्थांच्या मागणीला अखेर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पाठबळ दिले व त्यासाठी आवश्यक असणारी कामे लवकरात लवकर करून घेऊन या प्रकरणाला अंतिम स्वरूप देण्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.या सभेसाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबतच उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.2 रेखा सोलंकी, नॅशनल हायवेचे पोतदार, रिलायन्सचे मिश्रा, खैरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments