Ticker

6/recent/ticker-posts

फलटणमध्ये खुलेआम गुटख्याची विक्री, गुटखा बंदीच्या नियमांची सर्वत्र पायमल्ली(सत्य सह्याद्री विशेष वृत्त)


फलटण / विक्रम चोरमले
गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने लागू केला असला तरी फलटण तालुक्यात व शहरात सर्वत्र खुलेपणाने गुटखा विक्री सुरू आहे. ठराविक लोकांना हप्ते द्या आणि दुकाने, पानाच्या टपऱ्या वा अन्य कोठेही बिनधास्तपणे गुटखा विक्री करा, असा अलिखित फतवाच हप्तेखोरांनी काढला असल्याची परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे.

कर्करोगासारख्या घातक रोगांचे मूळ असलेली तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नका असे आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाकडून दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आली असून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. तरीही फलटण तालुक्यात व शहरात सर्वत्र खुलेआम चढय़ा भावाने गुटखा विक्री सुरू आहे. फलटण शहरात तर गुटखा विक्रीचा घाऊक बाजार झाला आहे.  फलटण शहरातील व तालुक्यातील अनेक किराणा मालाची दुकाने आणि पान टपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडूनही गुटखा विक्रीबाबत कारवाई होत नसल्याचे गुटखा विक्री जोरात सुरू आहे गुटखा विक्रीवर कोणाचेच नियंत्रण नसल्यासारखी परिस्थिती दिसत आहे. या गुटखा विक्रीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. मात्र जेथे कुंपणच शेत खात आहे, तेथे कारवाई कोणी करायची, कोणावर करायची व करणार कोण हे प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या गुटखा विक्री बंदीची सर्रास पायमल्ली होत असून आर्थिक हव्यासापोटी नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे वास्तव पहायला मिळत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलत हप्तेखोरांवर तसेच सर्रासपणे गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments