सातारा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावरील वर्दळीच्या ठिकाणी नो हॉकर्स आणि नो पार्किंग झोन असताना पालिकेचे अधिकारी चिरीमिरीसाठी दुर्लक्ष करत असल्याने अतिक्रमणे फोफावली आहेत. त्यामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात घडतात. लेखी-तोंडी दाद मागूनही कारवाई होत नसल्याने 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून राजवाडा बसस्थानकासमोर नागरिकांना सोबत घेत रस्तारोको करून पालिकेच्या कारभाराविरोधात शिमगा करणार असल्याचे निवेदन विजय काटवटे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
पालिकेत अध्यक्ष, मुख्याधिकारी यांना राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात वारंवार निवेदने दिली. हा रस्ता वर्दळीचा असून पाच शाळा, तीन क्लासेस, भाजी मंडई आणि वडाप वाहनांची वाहतूक याच भागात अधिक असते. व्यापार्यांची दुकाने आणि शाहुकला मंदिर याच रस्त्यावर आहे. सकाळी व संध्याकाळी शाळा सुटल्यावर तासोनतास या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. पालिका कारवाई करत नसल्याने लोकशाही दिनात दाद मागितली, तरी कागदी घोडे नाचवण्या पलिकडे विशेष काही होत नाही. म्हणून महिला व नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आठ दिवसात सर्व अतिक्रमणे तात्काळ काढावीत. अन्यथा प्रभागातील नागरिकांना सोबत घेत महिला दिन अर्थात 8 मार्च रोजी सकाळी 10 वा. राजवाडा बसस्थानकासमोर रास्ता रोको करून बोंब ठोकत शिमगा करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. याबाबत तातडीने शहरातील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिले आहेत.

0 Comments